शनिवार, ३१ मार्च, २०१२

महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, वाहतूक क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांना सहभागाची मोठी संधी : मुख्यमंत्री अमेरिकेचे वाणिज्यमंत्री जॉन ब्रायसन - मुख्यमंत्री यांच्यात चर्चा


मुंबई, दि. 30 :  मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या शहरांबरोबरच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, वाहतूक, पर्यटन आदी क्षेत्रात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. परस्पर फायद्याच्या अशा या विपुल संधींचा फायदा अमेरिकन कंपन्यांनी घ्यावा. विकासाच्या या प्रवाहात राज्य सरकार एका भागिदाराची भूमिका निभावेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जॉन ब्रायसन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला दिली.
या शिष्टमंडळात अमेरिकेचे मुंबईतील महावाणिज्यदूत पीटर हास, वाणिज्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकेतील विविध 16 उद्योग समुहांचे उच्चाधिकारी उपस्थित होते. राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री. ब्रायसन आणि त्यांच्या सोबतच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. ते म्हणाले अमेरिका आणि भारत यांच्यातील वाणिज्य व आर्थिक क्षेत्रातील सहकार्याची परंपरा फार जुनी आहे. अमेरिकेसारख्या विकसित देशाला महाराष्ट्रासारख्या प्रगतीपथावरील राज्यात अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र हे झपाट्याने नागरिकरण होणारे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. वाढत्या नागरिकरणामुळे राज्यासमोर अनेक आव्हाने उभी होत आहेत.  विशेषत: पायाभूत सुविधांची उभारणी, शहरी वाहतुकीच्या सुविधा आणि घरबांधणी या क्षेत्रातील आव्हानांना तोंड देण्यासाठी शासनाने खासगी-सार्वजनिक सहभागातून विकास करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अनेक ठिकाणी हा उपक्रम यशस्वी ठरला आहे. 
मुंबई शहरामध्ये मेट्रो, मोनो रेल या माध्यमातून वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येत आहे.  नागपूर हे राज्यातील अत्यंत महत्त्वाचे उपराजधानीचे शहर आहे. या ठिकाणीही विशेष आर्थिक क्षेत्राची उभारणी करून नव्या आंतरराष्ट्रीय अद्ययावत कार्गो हब व विमानतळाची उभारणी करण्यात येत आहे. केंद्र सरकारनेही दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक निर्यात करणारे, सर्वाधिक उत्पादन क्षमता असलेले
औद्योगिक राज्य आहे.  राज्यात पर्यटन विकासाच्याही अमर्याद संधी उपलब्ध आहेत.  या सर्व दृष्टीने महाराष्ट्रात अमेरिकन कंपन्या महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या विविध संधींचा फायदा घेऊन महाराष्ट्राच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी शिष्टमंडळातील विविध उद्योगांच्या प्रतिनिधींना केले. 
वित्तीय क्षेत्रात काम करण्यासाठीही उत्सुक – ब्रायसन
            अमेरिकेचे वाणिज्य मंत्री जॉन ब्रायसन यांनी महाराष्ट्रातील विविध संधी आजमावण्यासाठीच आपण मुद्दामच आपल्यासमवेत अमेरिकेतील महत्त्वाच्या उद्योगसमुहांच्या प्रतिनिधींना सोबत आणले आहे, असे स्पष्ट केले.  महाराष्ट्रातील औद्योगिक, पायाभूत सुविधा क्षेत्रातील संधींचा फायदा नक्कीच घेण्यात येईल आणि भारत व अमेरिका यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले.  महाराष्ट्र शासनाचा आतापर्यंत मिळालेला प्रतिसाद अतिशय उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी आवर्जुन नमूद केले. औद्योगिक गुंतवणुकीबरोबरच वित्तीय क्षेत्रात काम करण्यासाठीही आम्ही उत्सुक आहोत, असेही श्री. ब्रायसन म्हणाले. 
या चर्चेवेळी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मल्लिक, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहूल अस्थाना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव के. शिवाजी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी आदी वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
            या शिष्टमंडळात ऑटो डेस्क, ब्लॅक अँड व्हिटेक कार्पोरेशन, सी. एच. रॉबिनसन वर्ल्डवाईल्ड, सीएचटूएम हिल इंडिया, ईएचडीडी आर्कीटेक्चर, जनरल इलेक्ट्रीक, इनोवारी, जेकब्ज इंजिनिअरिंग ग्रूप, लॉर्ड कार्पोरेशन, मॅझेटी नॅश, मिडवेस्टॉवको कार्पोरेशन, ओसी सॉफ्ट, प्राईसवॉटरहाऊसकुपर्स, टार्गेट इंजिनिअरिंग ग्रूप, सिनेरेन टेक्नॉलॉजी कार्पोरेशन, यूआरएस कार्पोरेशन आदी कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश होता. 
-----०-----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा