मुंबई, दि. 30: जनरल मोटर्स व महाराष्ट्र शासन यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधानभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.
या करारानुसार जनरल मोटर्स ही अमेरिकन कंपनी महाराष्ट्रात एकूण 6400 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहे. कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेरी बॅरा यांनी याबाबत भारत आणि सिंगापूरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री यांची भेट घेतली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी आदी उपस्थित होते.
जगातील वाहन उत्पादनात आघाडीवर असलेल्या जनरल मोटर्स कंपनीने महाराष्ट्रात अधिकाधिक वाहनांची निर्यात करता यावी यासाठी पुणे जिल्ह्यातील तळेगांव येथील प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 6400 कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे.
जनरल मोटर्स या कंपनीने महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. या कंपनीची तळेगाव येथील वाहननिर्मितीची क्षमता 1,70,000 युनीटस इतकी आहे. या प्रकल्पाच्या क्षमता वाढीसाठी 4.3 बिलीयन अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक कारच्या वेगवेगळ्या मॉडेल, जसे बिट, सेल आणि स्पार्क करणार आहेत. देशांतर्गत वाहनांची पूर्तता केल्यानंतर 2014 साली चिली या देशाला पहिली निर्यात सुरु केली. या प्रकल्पासाठी तीनशे एकर जागा महाराष्ट्रात औद्योगिक विकास महामंडळाकडून 95 वर्षाच्या कराराने देण्यात आलेली असून 1000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
याशिवाय जवळपास 200 मिलीयन डॉलर्सची गुंतवणूक 1,60,000 युनीटची शक्तीशाली इंजीन बनविण्यासाठी केलेली आहे. ही क्षमता 3,00,000 युनीटस् इंजिन इतकी वाढू शकते आणि त्यामुळे 1400 अधिक लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
ग्राहकांना मागणी व सेवा पुरविण्यासाठी कंपनीने देशात 275 सेवा केंद्रे व 269 विक्री केंद्रे स्थापन केलेली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 33 सेवा केंद्रे व 29 विक्री केंद्रे स्थापन केलेली आहेत व त्यांचे प्रमाण 11 व 12 टक्के इतके आहे.
जनरल मोटर्सची सद्य:स्थितीची गुंतवणूक व महाराष्ट्रातील मर्सिडीज, फोक्सवॅगन, महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, टाटा मोटर्स, स्कोडा इ. यांचा एकत्रित विचार करता महाराष्ट्र वाहन निर्मिती क्षेत्रात भक्कम स्थितीत आहे. महाराष्ट्र भारतातले वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य राज्य आहे. राज्य सरकारने वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांसह विस्तार करण्यासाठी आगाऊ चर्चा व प्रयत्न सुरू केलेले आहेत.
मुख्यमंत्र्याच्या अमेरिका दौऱ्यात क्राईसलर यांच्याशी सुध्दा नव्याने ग्रॅण्ड चेरॉकी या वाहनाचे उत्पादन करण्याबाबत निर्णय घेतला आहे.
या सामंजस्य करारानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केले. यावेळी विधानसभेच्या गॅलरीमध्ये जनरल मोटर्सच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मेरी बॅरा या उपस्थित होत्या. त्यांचेही स्वागत मुख्यमंत्र्यांनी योवळी केले.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा