गुरुवार, ३० जुलै, २०१५

नाविन्यपूर्ण योजनेसाठी योग्य लाभार्थ्यांची निवड करावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ



धुळे, दि. 30 :- पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत द्यावयाच्या लाभार्थ्यांची योग्य निकषाच्या आधारे  निवड करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज दिल्या.
            पशुसंवर्धन विभागाच्या नाविन्यपूर्ण योजना 2015-16 च्या जिल्हास्तरीय लाभार्थ्यांच्या निवडीची बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात झाली.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एच. एम. खलाणेकर, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. यु. डी. पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी बी. एच. नागरगोजे आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नाविन्यपूर्ण योजनांची सखोल माहिती देण्याकरिता कार्यशाळा आयोजित करून  योग्य लाभार्थ्यांची निवड करण्याबाबतची माहिती  देण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा तालुक्यात नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत 6 संकरित गायी/म्हैस गट, अंशत: ठाणबंद पध्दतीने शेळी पालन (10 शेळ्या व एक बोकड),  एक हजार मांसल कुक्कुट पालन योजनांचा लक्ष्यांक वितरीत केला. लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाल्यानंतर योग्य पध्दतीने पशुधनाच्या संगोपनाची पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचे वाटप
            यावेळी पशुसंवर्धन खात्याचे निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना कृत्रिम रेतनापासून जन्मलेल्या संकरित कालवडी/पारडयांच्या संगोपनासाठी प्रोत्साहन रक्कमेच्या 5 हजार रूपये धनादेश प्रत्येकी विखरण ता. शिरपूर येथील रोहीत सुदाम पाटील आणि वरखेडा (कुसुंबा) ता. धुळे येथील वामनराव लहू मराठे यांना प्रातिनिधीक स्वरूपात वितरीत करण्यात आले.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा