गुरुवार, ३० जुलै, २०१५

नागरिकांना जास्ती-जास्त आरोग्य सुविधा द्या जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 29 :- जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
            राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नियामक मंडळाची सभा आणि जिल्हास्तरीय सुकाणु समितीची सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आयोजित करण्यात आली.  त्यावेळी  ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील भामरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. वानखेडे,  अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. आर. पवार,   डॉ. जे. एम. बोरसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. व्ही. पाटील (धुळे), डॉ. ए. एच. लोया (शिरपूर),      डॉ. व्ही. एस. वानखेडे (साक्री), शिरपूर उपजिल्हा रूग्णालयाचे डॉ. ध्रुव वाघ,  जिल्हा प्रकल्प अधिकारी     (नगर पालिका प्रशासन) श्रीमती शिरसाठ, प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे ए. ए. देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती ए. के. आठवले, लेखा व्यवस्थापक यु. बी. देशपांडे  आदी उपस्थित होते.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, रूग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, ग्रामीण रूग्णालये, जिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून चांगल्या आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात.
            या सभेत राष्ट्रीय अभियान अंतर्गत आरसीएच, एनएचएम पार्ट बी, नियमित लसीकरण, तालुका निहाय जननी सुरक्षा योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, बाल आरोग्य, किशोर स्वास्थ कार्यक्रम, फॉलीक ॲसीड औषधे वाटप, आशा योजना, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम, रूग्ण कल्याण समिती आदी  योजनांचा आढावा घेतला.  तसेच अतिसार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत 27 जुलै ते 8 ऑगस्ट, 2015 पंधरवाडा आयोजित करण्याबाबतची माहिती यावेळी  दिली.  या उपक्रमांतर्गत झींग व ओआरएस या औषधांचे वाटप जिल्ह्यात करण्यात येणार असल्याचेही यावेळी  सांगितले.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा