शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

महाराष्ट्र आणि इस्त्रायल यांचे घनिष्ट भावनिक संबंध --ॲलॉन उश्पीझ्


मुंबई, दि. 9 : भारतात राहणाऱ्या ज्यू समाजापैकी बहुसंख्य ज्यू महाराष्ट्रात वास्तव्यास असल्याने इस्त्रायलचे महाराष्ट्राबरोबर घनिष्ठ भावनिक संबंध आहेत, असे प्रतिपादन इस्त्रायलचे भारतातील नवनियुक्त राजदूत ॲलॉन उश्पीझ् यांनी काल येथे केले.
          नवनियुक्त राजदूत ॲलॉन उश्पीझ् यांनी काल राजभवन येथे राज्यपाल                  के. शंकरनारायणन यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी इस्त्रायलच्या मुंबईतील महावाणिज्य दूत श्रीमती ओर्ना सॅजीव्ह आणि इतर प्रतिनिधी उपस्थित होते.
          ॲलॉन उश्पीझ् म्हणाले की, भारत आणि इस्त्रायल या देशांचे राजनैतिक संबंध 1992 पासून सुरु  असून दोन्ही देशांतील अनेक क्षेत्रात ते दृढ झाले आहेत. महाराष्ट्रात विदर्भ, राहुरी आणि दापोली येथे इस्त्रायलच्यावतीने तीन प्रकल्प सुरु असून या ठिकाणी शेती उत्पादन वाढविण्याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाते, अशी माहिती राजदूतांनी यावेळी राज्यपालांना दिली. इस्त्रायल भारतीय विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या देवाण-घेवाणीस देखील प्रोत्साहन देते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          इस्त्रायलच्या मुंबईतील महावाणिज्य दूत श्रीमती ओर्ना सॅजीव्ह यांनी इस्त्रायलमध्ये महाराष्ट्रातून स्थलांतरीत झालेल्या भारतीय ज्यू जनतेची मुले मराठी भाषेत बोलतात, अशी माहिती यावेळी दिली.
          राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी नवनियुक्त राजदूतांच्या भारतातील कारकिर्दीत भारत आणि इस्त्रायल देशांचे संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास व्यक्त केला.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा