मंगळवार, २३ जून, २०१५

शाळाबाह्य बालकांच्या सर्वेक्षणात एकही घर, वाडी-वस्ती सुटणार नाही याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे, दि. 20 :- 6 ते 14 वयोगटातील शाळाबाह्य बालकांचे  दि. 4 जुलै, 15 रोजी जिल्ह्यात होणाऱ्या सर्वेक्षणात एकही घर, वाडी-वस्ती सुटणार नाही अशी लोकचळवळ जिल्ह्यात व्हावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात राज्यातील शाळाबाह्य बालकांचे एक दिवसीय सार्वत्रिक सर्वेक्षणाच्या जिल्हास्तरीय समिती सभा जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली.  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मोहन देसले, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. राहूल चौधरी, महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, सर्वेक्षण अधिकारी म्हणून जिल्हा परिषद शिक्षक आणि खाजगी माध्यमिक शाळांचे शिक्षक घ्यावेत, 20 सर्वेक्षण अधिकाऱ्यांवर एक झोनल ऑफीसर म्हणून खाजगी, माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व केंद्र प्रमुखांची नियुक्ती करावी.  20 झोनल ऑफीसरांवर एक नियंत्रक अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उप अभियंता, विस्तार अधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक यांच्या नियुक्त्या करण्यात याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
            पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, तालुका पातळीवर  सर्वेक्षण अधिकारी, झोनल ऑफीसर व नियंत्रक अधिकारी यांच्यासाठी  दि. 29 जून  रोजी धुळे व साक्री तालुका, दि. 30 जून, 15 रोजी शिरपूर व शिंदखेडा तालुक्यात कार्यशाळा घेण्यात याव्यात.  तसेच जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांनी तालुकास्तरीय समितीची बैठक आयोजित करून पुढील नियोजन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
0000000


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा