शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१२

कुष्ठरोग्यांनाही समाजाने सन्मानाची वागणुक द्यावी :- जिल्हाधिकारी प्रकाश महाजन




धुळे दि.9 :- कुष्ठरोग ही समस्या पिढयान पिढया हाताळणे कठीण असून पुर्वी कुष्ठरोग्यावर बहिष्कार टाकला जात होता.परंतू भारतासारख्या विकसित देशाला ही चिंतेची बाब असून कुष्ठरोगीही समाजाचा एक घटक असून त्याला सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी आज केले.
      आज नवनिर्माण समाजसेवक संघाच्या कुष्ठरोग अभियान योग विद्यावर्घिनी सस्थेच्या रंजना नेवे व प्रतिभा नेवे यांनी लावलेल्या वृक्षांना वृक्षवंदना कार्यक्रमाचे जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.यावेळी वृक्ष मित्र वसंतराव ठाकरे, लखन भतवाल, प्रा.न.म.जैन,अतुल सोनवणे,मुकूंद भावे,प्रभाकर बेंद्रे, डॉ.तिवारी  यावेळी उपस्थित होते.
      कृष्ठधामात जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्या हस्ते नवीन वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी ते मार्गदर्शन करतांना म्हणाले की,समाजात सामाजिक प्रतिष्ठा महत्वाची मानली जाते त्यामुळे कुष्ठरोगासारखा आजार लपवला जातो भारतात कुष्ठरोगाचे प्रमाण कमी होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.मालेगाव सारख्या शहरात पल्स पोलिओच्या डोस घेण्यासाठी विरोध होतो.तर या रोगाची काय परिस्थिती असेल तरी समाज सेवकांनी सामाजिक भावनेने या रोग्यांना  मुख्य प्रवाहात आणावे . दानशुर व्यक्ती,स्वंयसेवी संस्थानी पुढे येवून अशा आश्रमांना मदत करावी असेही आवाहन जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांनी आज केले.
00000

4 मार्च रोजी महा-लोक अदालतीचे आयोजन


धुळे दि.9 :- सदस्य सचिव,जिल्हा सेवा प्राधिकरण,धुळे यांच्या मार्फत दि. 4 मार्च,2012 रोजी कामगार न्यायालय, पत्रकार भवन, साक्री रोड,धुळे येथे महालोक अदालतीचे सकाळी 10-30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.तरी कामगार न्यायालयात प्रलंबित असलेल्या केसेस ज्यांना महा-लोक अदालत मध्ये ठेवयाच्या असतील त्या सर्व इन्शु कंपनी ,पक्षकार, युनियन प्रतिनिधी,यांनी आपले दावे प्रकरणे तडजोडी साठी संमतीपत्रक दि.1 मार्च,2012 पर्यत कामगार न्यायालय,धुळे येथे भरुन सादर करावे असे न्यायालय अधीक्षक, कामगार न्यायालय,धुळे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
0000

मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०१२

27 जिल्हा परिषदा आणि 305 पंचायत समित्यांसाठी आज मतदान


मुंबई, दि. 6 : राज्यातील 27 जिल्हा परिषदांच्या आणि 305 पंचायत समित्यांच्या जागांसाठी उद्या (ता. 7) मतदान होणार असून जिल्हा परिषेदेच्या 1,624 जागांसाठी 7,116; तर पंचायत समित्यांच्या 3,218 जागांसाठी 13,473 एवढे उमेदवार रिंगणात आहेत. मतदानासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी दिली आहे.
श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी, मुलचेरा या आठ पंचायत समित्या आणि तेथील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी सकाळी 7.30 ते दुपारी 3.00 या वेळेत मतदान होईल. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि सिरोंचा या चार पंचायत समित्यांसाठी आणि तेथील जिल्हा परिषदेच्या गटांसाठी मात्र 12 फेब्रुवारी 2012 रोजी मतदान होणार आहे. एकूण 3,89,04,388 मतदार उद्या आपला मतदानाचा हक्क बजावतील. त्यात 1,86,45,417 स्त्री; तर 2,02,58,971 पुरुष मतदारांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण 59,914 मतदान केंद्र आणि सुमारे 1 लाख 38 हजार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यभरात सुमारे 7,000 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. या मतदान केंद्रांसह गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षिततेसाठी अधिक काळजी घेण्यात आली असून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान उद्या असले तरी सर्व ठिकाणची मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 होणार आहे, अशी माहितीही श्रीमती सत्यनारायण यांनी दिली आहे. 

अधिकाधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुकांच्या प्रक्रियेत मतदार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. त्याला केंद्र स्थानी ठेऊन राज्य निवडणूक आयोगाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यास अधिकाधिक मतदारांनी प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात मतदानाचा आपला बहुमूल्य हक्क बजावून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहनही राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी केले आहे.
0-0-0

औद्योगिक उपक्रम व आस्थापनातील मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी द्यावी


मुंबई, दि. 6 : जिल्हा परिषद, पंचायत समित्या व महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका 2012 करिता त्या क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यात कार्यरत असलेल्या मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रात दिनांक 7 फेब्रुवारी, 2012 रोजी तर महानगरपालिका क्षेत्रात गुरुवारी दिनांक 16 फेब्रुवारी, 2012 रोजी सुट्टी देण्यात यावी. परंतु मतदानाच्या दिवशी अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्याप्रमाणावर नुकसान होईल अशा उद्योगातील कामगार मतदारांना हे आदेश लागू होणार नाहीत. परंतु अशा आस्थापनेतील/उद्योगातील कामगारांना मतदानाचा हक्क बजविण्यासाठी दोन तासाची विशेष सवलत देण्यात यावी, असेही शासनाने सूचित केले आहे.
सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संगणक सांकेतांक 20120206075945245001 असा आहे.

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१२

मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास अनुमती


मुंबई, दि. 5 : लोकसभा, विधानसभा तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास भारतीय निवडणूक आयोगाने व राज्य निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे.
          यासंदर्भात शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकानुसार मतदारांना ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. तथापि, ज्या मतदारांकडे ओळख पटविण्यासाठी, शिधापत्रिकेव्यतिरिक्त अन्य विहित केलेले पुरावे उपलब्ध नाहीत, अशा मतदारांना त्यांच्या घटनादत्त अधिकारापासून वंचित रहावे लागू नये म्हणून दि. 5 जुन 2010 च्या परिपत्रकात अंशत: बदल करुन केवळ मतदानाच्या दिवशी मतदाराची ओळख पटविण्यासाठी शिधापत्रिकेचा वापर करण्यास अनुमती दिली आहे.  
0 0 0 0




मुख्यमंत्र्यांना निवेदने, पत्रे पाठविण्यासाठी नवीन ईमेल पत्ता वापरण्याचे आवाहन


मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री सचिवालयाचा chiefminister@maharashtra.gov.in हा ईमेल पत्ता बंद करण्यात आला असून त्याऐवजी cm@maharashtra.gov.in आणि cm-mh@nic.in असे दोन नवीन ईमेल पत्ते तयार करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने, पत्रे पाठविण्यासाठी आता जुन्या पत्त्याऐवजी नवीन पत्त्यांचा वापर करावा, असे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत कळविण्यात येत आहे.
शासकीय कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे शासनाचे धोरण असून सर्व कार्यालयांचे संगणकीकरण झालेले आहे व इंटरनेटच्या माध्यमातून सर्व कार्यालये जोडली गेलेली आहेत. ईमेलद्वारा पत्रव्यवहार झाल्यास कागदाचा वापर कमी होऊन पर्यावरण संरक्षणासही मदत होणार आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकांनी नव्या ईमेल पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                          0000000

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

दहावीची परीक्षा 1 मार्च पासून


मुंबई, दि. 31 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे मार्च, 2012 मध्ये घेण्यात येणारी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 10 वी) मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळात 1 मार्च 2012 पासून  सुरु होत आहे.
विज्ञान व पूर्व व्यावसायिक शाखेमधील विषयांची प्रात्यक्षिके, तोंडी व लेखी परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येईल. विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा, विज्ञान विषयाच्या लेखी परीक्षेच्या कालावधीत आणि तोंडी व श्रेणी परीक्षा सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी तर तंत्र व पूर्व व्यावसायिक विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा शुक्रवार दिनांक 17 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी 2012 या कालावधीत घेण्यात येईल.
            मुकबधीर, बहुविकलांग या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शरीर व आरोग्यशास्त्र तसेच गृहशास्त्र या विषयांची प्रात्यक्षिक परीक्षा सोमवार दिनांक 23 एप्रिल 2012 रोजी अनुक्रमे सकाळ व दुपारच्या सत्रामध्ये घेण्यात येईल. प्रात्यक्षिक परीक्षेची निश्चित तारीख व दिवस इत्यादी माहितीसाठी परीक्षार्थींनी शाळा प्रमुखांकडे 11 फेब्रुवारी 2012 पूर्वी संपर्क साधावा.
परीक्षार्थींनी परीक्षेच्या दिवशी परीक्षास्थळी सकाळी 10 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षा सुरु होण्याच्या नियोजित वेळेनंतर 30 मिनीटांपेक्षा उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही व सदर विषयाला अनुपस्थित समजण्यात येईल.
अंध तसेच सेरेब्रल पाल्सी, अस्थिव्यंग, अल्पदृष्टी, कॅन्सरग्रस्त, मज्जातंतू विकारग्रस्त, स्वमग्न विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा प्रत्येक तासाला 20 मिनिटे या प्रमाणात जास्त वेळ तर  मुकबधीर विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी एकूण 30 मिनिटे आणि अध्ययन अक्षमता विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी लेखी परीक्षेच्या निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा 25 टक्के जास्त वेळ देण्यात येईल. सर्वसाधारण परीक्षार्थ्यांपेक्षा बहुविकलांग परीक्षार्थींना 90 मिनीटे जादा वेळ प्रत्येक प्रश्नपत्रिकेसाठी देण्यात येईल. परंतु यासाठी मंडळाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
परीक्षार्थींनी आपल्या उत्तरपत्रिकेवरील व पुरवणीवर विहीत जागेवर आपला बैठक क्रमांक अक्षरात व अंकात बिनचूक लिहावा. उत्तरपत्रिका व पुरवणीच्या अन्य कोणत्याही भागात बैठक क्रमांक लिहिल्यास किंवा ओळख पटविण्यासाठी सांकेतिक खुण केल्यास या सूचनेचा भंग केला म्हणून त्याची शिक्षासूचीनुसार संपादणूक रद्द करण्यात येईल. परीक्षार्थींना परीक्षा कक्षात कोणतेही पुस्तक वा कागद आणण्यास मनाई आहे.
            सर्व विषयांच्या उत्तरपत्रिकेवर बारकोड पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना बारकोड संबंधीची माहिती परीक्षा सुरु होण्यापूर्वी देण्यात येणार असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी 30 मिनिटे अगोदर परीक्षागृहात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
विज्ञान व तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका एकच असून त्यामध्ये भाग 1 व 2 असे दोन वेगवेगळे भाग आहेत. त्यासाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका प्रत्येक भागाप्रमाणे सोडविण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
00000000