मंगळवार, ३१ जानेवारी, २०१२

मुलींचे प्रमाण कमी होणे ही समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट --- जिल्हाधिकारी प्रकाश महाजन


धुळे :- राज्यात धुळे जिल्हयाचे मुलींच्या जन्मदराचे प्रमाण अतिशय कमी असून ती आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट असून सुशिक्षित समाजाला यासाठी चिंतन व मननाची आवश्यक असून भविष्यात मुलांना लग्नासाठी मुलीच मिळणार नाहीत हा धोकाही समाजाने लक्षात घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा पीसीपीएनडीसीचे अध्यक्ष प्रकाश महाजन यांनी आज केले.
     राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा आणि Online From Filling च्या एक दिवशी कार्यशाळेचे जिल्हा शल्य चिकित्सक धुळे, महानगरपालिका, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेचे दिप प्रज्वलन करुन जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. बी. एन. देशपांडे यांच्या उदघाटन हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी प्रकाश महाजन हे होते. तर प्रमुख पाहुणे मनपा आयुक्त हनुमंत भोगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, आय एम ए चे अध्यक्ष डॉ. के. एल. बोरा, निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुंढे, डॉ. रवि वानखेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर, डॉ. बी. बी. माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महाले उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यावेळी म्हणाले की, सुज्ञ लोकच समाजाचे मोठया प्रमाणात नुकसान करत असून त्यांना जर कायद्याची भिती वाटत नसेल तर परमेश्वराचा कायदा त्यांना  निश्चितच दंडीत करेल. बुध्दीजीव समाजाने विचार केला पाहिजे. कारण आपण समाजाचे काही तरी देणेदार लागतो. डॉक्टरांनी  पैशाचा लोभापाही समाजाचे नुकसान करु नये,त्यांच्याकडे  असे कृत्य कोणी करायला येत असेल तर त्याला पोलीसांच्या ताब्यात द्यावे असे सांगीतले. ते पुढे म्हणाले की, समाजातील सुज्ञ लोकांनी विपषण केल्यास त्यातून खूप काही मिळते त्यामुळे असे कृत्य करण्यास ते धजावणार नाहीत असे अनेक उदाहरणांसह  जिल्हाधिका-यांनी यावेळी सांगीतले.
     आपल्या उदघाटनपर भाषणात न्या. बी. एन. देशपांडे म्हणाले की, समाजातील अशा  प्रतिष्ठित  लोकांवर आम्हाला शिक्षा करण्याची पाळी आणू नये. समाजात काही डॉक्टर विकृत मनोवृत्तीचे असल्यामुळे पैशाच्या हवासापाई केलेले कृत्य समाजाला कुठे घेवून जात आहे. समाजात परमेश्वरानंतर डॉक्टराला देव समजला जातो. काही डॉक्टर
समाजात आपली प्रतिष्ठा लोभापायी खराब करीत असून चारित्र्यवान डॉक्टर प्रलोभनाला बळी पडणार नाही याची मला खात्री असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
     जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यावेळी म्हणाले की, समाजाला नवीन तंत्रज्ञानाचा फायदा जरी झाला असेल तर तोटा मोठा होत आहे. तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेवून काही डॉक्टर गर्भधारणपूर्व व प्रसवपूर्व लिंग तपासणी करुन मुलींचा समाजाचा रेषो खालावत आहेत. त्यामुळे सामाजिक सुधारणेची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
     आय.एम.ए. चे अध्यक्ष डॉ. के. एल. बोरा यावेळी म्हणाले की राष्ट्रीय व राज्यस्तरावर आय. एम. ए. संघटना आमच्या लोकांविरुध्दच उभी असून असे कृत्य करतांना आमचा व्यवसायिक बंधू जर आढळला त्यावर आय.एम.ए. बंदी घालणार आहोत. असे कृत्य करणा-याला समाजापुढे आणल्यास त्यांना आयएमए तर्फे  एक लाख रुपयाचे  पारितोषिकही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     यावेळी मनपा आयुक्त हनुमंत भोंगळे म्हणाले की, धुळे जिल्हयाचा मुलींचा हजारामागील रेषो 883 वा आला असून ही गंभीर बाब आहे. सर्व समाजाला विचार करण्याची वेळ आली असून असे कृत्य करणा-या डॉक्टरांना नोटीस देवून भागणार नाही तर त्यांना दंडीत केले पाहिजे. आपली संस्कृती काय आहे हे त्यांना कळलेच नाही, पैशाच्या लोभापायी असे कृत्य करतांना त्यांना समाजाने उघडे पाडावे. समाजात डॉक्टर, वकिल, शिक्षक, पत्रकार,अधिकारी यांच्या मार्फत जनजागृती मोठया प्रमाणात झाली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
     प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एन. लाडीकर यांनी आपल्या प्रास्तविकात सांगितले की, जिल्हयात 94 सोनोग्राफी सेन्टर असून ग्रामीण भागात 26 तर शहर भागात 68 आहे. त्यापैकी 6 सेन्टर सील केलेले असून यापुढे अध्यक्षांच्या परवानगीने प्रत्येक सोनोग्राफी सेंन्टरची कडक तपासणी करण्यात येणार आहे. स्त्री-पुरुषाचे  प्रमाण समांतर राहण्यासाठी समाजातील प्रतिष्ठित डॉक्टरांनीच पुढाकार घेण्याची वेळ आली असल्याचे  सांगितले. 
     कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मेडिकल कॉन्सीलचे कार्यकारणी सदस्य डॉ. रवि वानखेडकर यांनी पीसीपीएनडीसी कायदा व सोनोग्राफी सेन्टर चालविण्यासाठी लागणारे लायसन्स व इतर कागदपत्रांची  डॉक्टरांनी करावयाची पूर्तता याबाबत  माहिती दिली.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाहिदअली यांनी केले तर आभार डॉ.रवि वानखेडकर यांनी मानले.
000

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी सुरेंद्र गांगण उपाध्यक्षपदी संदेश सावंत


मुंबई, दि. 30 : मंत्रालयातील मिनी थिएटरमध्ये आज झालेल्या मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक निवडणुकीत डी.एन.ए.चे सुरेंद्र गांगण यांची अध्यक्षपदी निवड झाली असून उपाध्यक्षपदी दै. लोकमतचे संदेश सावंत यांची बिनविरोध निवड झाली.
          या निवडणुकीच्या सायंकाळी घोषित झालेल्या निकालानुसार टाइम्स ऑफ इंडियाचे संजीव शिवडेकर हे कार्यवाह म्हणून तर आकाशवाणीचे दिलीप जाधव हे कोषाध्यक्षपदी निवडून आले आहेत. मनीषा रेगे (पीटीआय), मंदार पारकर (पुण्यनगरी), विनोद जगदाळे (न्यूज 24), खंडुराज गायकवाड (जनप्रवास), अझीझ इजाज (उर्दू टाइम्स) हे संघाच्या कार्यकारिणीच्या सदस्यपदी निवडून आले आहेत.
          या निवडणुकीत निवडणूक अधिकारी म्हणून विनय खरे यांनी काम पाहिले. निकालानंतर संघाचे मावळते अध्यक्ष अनिकेत जोशी यांनी मिनी थिएटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदाचा कार्यभार सुरेंद्र गांगण यांच्याकडे सुपूर्द केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
0 0 0 0 0

शुक्रवार, २७ जानेवारी, २०१२

असंरक्षित, माथाडी व घरेलू कामकागारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु -- ना. राजेंद्र गावीत



धुळे दि. 26 जाने.12 :- असंरक्षित व माथाडी कामगार मंडळाचे व घरेलू कामगारांचे प्रश्न सोडविणयासाठी आपण प्रयत्नशिल असून त्यासाठी नाशिक येथे विभागीय स्तरावर धुळे, नंदुरबार व जळगांव जिल्हयाच्या बैठकीचे लवकरच आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास, कामगार, लाभक्षेत्र व फलोत्पादन राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांनी आज दोंडाईचा विश्रामगृहात आयोजित माथाडी कामगार मंडळाच्या बैठकीत बोलतांना केले.
       दोंडाईचा येथे आज राज्याचे आदिवासी विकास व कामगार राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या अध्यक्षतेखाली असंरक्षित व माथाडी कामगार व घरेलू कामगार महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर, माजी आ.राकृष्ण पाटील, माथाडी कामगार मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
       यावेळी ना. गावीत यांनी माथाडी कामगार व कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडते यांच्याशी चर्चा करुन म्हणणे ऐकुण घेतले. तसेच कृषी उत्पन्न बाजारी समितीत शेतकऱ्यांच्या मालाला तीन वेळा लेव्ही लागते ती कमी करुन एक किंवा दोन वेळा करावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.यावर निश्चित मार्ग काढू असेही त्यांनी यावेळी सांतिगतले. तसेच कामगार मंडळाचे प्रश्न लवकरच मार्गी लावू असेही त्यांनी यावेळी सांगितले.
       ते पुढे म्हणाले की, कामगारांच्या मागण्यांबाबत निश्चित विचार करुन त्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करु असे सांगितले.
000
       




भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण
राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या हस्ते संपन्न
                धुळे दि. 26 जाने. 12:- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे आदिवासी विकास, कामगार, लाभक्षेत्र व फलोत्पादन खात्याचे राज्यमंत्री ना. राजेंद्र गावीत यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर शानदार सोहळयात संपन्न झाला. यावेळी मंत्रीमहोदयांनी पोलीस दलाची मानवंदना स्विकारुन परेडची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे उपस्थित होते.
       यावेळी ना. गावीत यांनी उपस्थित जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छापर संदेशात  सांगितले की, जिल्हयात अनेक महत्वपूर्ण प्रकल्पांची उभारणी होत असून त्यात प्रामुख्याने उल्लेख करावा अशा दोंडाईचा औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी मेथी-विखरण या दोन्ही गावातील 435.87 हेक्टर आर जमिन संपादित करण्यासाठी 10 लाख रुपये प्रतिहेक्टरी वाढीव दराने मोबदला देण्याच्या भुधारकांच्या मागणीनुसार आणि प्रशासनाच्या शिफारशीनुसार शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार जमीन खरेदीस सुरवातही झालेली आहे. दोन हजार कोटी रुपयांचा साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे सौर ऊर्जा महा प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 460 हेक्टर वन जमिनीचा प्रस्ताव भारत सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरीडॉर प्रकल्पांतर्गत मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर 10 हजार हेक्टर क्षेत्रावर कार्गोहब प्रकल्पाची उभारणी, 500 कोटी रुपयांचा लुपीन फौंडेशन संस्थेतंर्गत जिल्हयातील 225 गावांचा पायाभूत विकास  होत असून  सोनगीर येथे रुपये 3,400 कोटी गुंतवणूक करुन 48 हेक्टर क्षेत्रावर 567 के.व्ही. उप केंद्रासाठी मंजुरी मिळाली आहे. अशा अनेक प्रकल्पातून सुशिक्षित बेरोजगार, सर्वसामान्य माणसाच्या हातास काम मिळणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सातत्याचे प्रयत्न आहेत.                                                                                              
       जिल्हयातील साक्री व शिरपूर तालुक्यातील आदिवासी बांधवांना वन हक्काच्या 67,023.25 एकर जमिनीचे 13,260 लाभार्थ्यांना  वाटप करण्यात आले असून त्यामुळे आदिवासीच्या जीवनांत नवी पहाट निर्माण झाली आहे. राज्य शासन कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने विचार करत असून कामगारांना त्यांच्या कामाचा पुरेपूर मोबदला मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हयात दोन मोठे बॅरेज व अक्कलपाडा धरणाचे काम अंतीम टप्प्यात असल्यामुळे शेतक-यांना सिंचनाची मोठया प्रमाणात सोय झाली असून धुळे शहरासह जिल्हयाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटला आहे. जिल्हयात शैक्षणिक संस्थांचे जाळे मोठया प्रमाणात विणले गेले  आहे.
       जिल्हयातील शेतक-यांनी शेतीला जोड धंदा म्हणून फलोत्पादनासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करावेत यासाठी शासन मोठया प्रमाणात सबसिडी देते. त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घ्यावा.  त्याच बरोबर शेततळयांना मोठया प्रमाणावर प्राधान्य देऊन शेततळयांच्या माध्यमातून शेतक-यांना वेगवेगळे पिके घेण्यास मदत होईल.
       जिल्हयाच्या विकासाला ख-या अर्थाने चालना मिळते ती दळणवळणांच्या साधनांपासून. धुळे जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्र. 3 च्या चौपदरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे.  नागपूर ते सुरत या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 च्या चौपदरी-करणाची निविदाही काढण्यात आली असून या कामास लवकरच चालना मिळणार आहे. चौपदरीकरणामुळे जिल्हयाच्या विकासात निश्चित भर पडणार आहे.श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाचे काम मोठया प्रमाणावर प्रगतीपथावर असून लवकरच सामान्य रुग्णांसाठी  ते खुले केले जाईल.
       ते पुढे म्हणाले की घरेलू कामगार महिलांचा प्रश्नही गंभीर असून घरेलू कामगारांची नोंदणी सुरु केलेली आहे.यावेळी ना. गावीत यांच्या हस्ते महानगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता उत्सवानिमित्त शहरातील महाविद्यालये व विद्यालयांना प्रमाण्पत्रांचे वाटप करण्यात आले त्यात  जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवपुर, धुळे, कमलाबाई शंकरलाल कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, धुळे, न्यु सिटी हायस्कुल, धुळे, कानोसा कॉन्व्हेट हायस्कुल, धुळे, जे. आर. सिटी हायस्कुल, धुळे आणि एकविरा हायस्कुल, धुळे या शाळांना निर्मलशाळा व निर्मल महाविद्यालय पुरस्कार देण्यात आला. यावेळी मंत्रीमहोदयांनी वेगवेगळया शाळांनी आयोजित सांस्कृतीक कार्यक्रमाचा लाभ घेतला.
       यावेळी महापौर मंजुळा गावीत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कलाताई ठाकरे, उपाध्यक्ष सुभाष देवरे, न्यायमूर्ती बी.एन. देशपांडे, महानगरपालिका आयुक्त हनुमंत भोंगळे,अधिक्षक अभियंता बेंद्रे, वैद्यकीय अधिष्ठात डॉ. गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी विवेक गायकवाड , शाम सनेर, युवराज, करनकाळ,एम.जी. ढिवरे,पदाधिकारी , स्वातंत्र्य सैनिक , ज्येष्ठ नागरीक , लोकप्रतिनिधी, पत्रकार , अधिकारी, कर्मचारी ,विद्यार्थी मोठया संख्येने  उपस्थित होते.
000

विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते विधान मंडळाच्या प्रांगणात ध्वजारोहण


मुंबई, दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील विधानभवन येथे महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते आणि विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. विधानभवनाच्या प्रांगणात आज सकाळी आयोजित ध्वजारोहण सोहळा कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदींसह विधीमंडळाचे सदस्य, विधानमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे, सहसचिव भाऊसाहेब कांबळे, यु. के. चव्हाण आदींसह विधानमंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
          मुख्य सुरक्षा अधिकारी शिवाजी बोडखे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.
000

राज्यपालांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे ध्वजारोहण गेल्या 50 वर्षात राज्याची चौफेर प्रगती : राज्यपाल


मुंबई दि. 26 : राज्याने गेल्या 50 वर्षात चौफेर प्रगती केली असून आर्थिक विकास, सामाजिक व राजकीय सुधारणा  यात  महाराष्ट्र राज्य नेहमीच अग्रेसर राहिला आहे. देशाच्या सकल विकास उत्पन्नात राज्याचे 50 टक्के योगदान आहे. उद्योग क्षेत्रातही राज्यात देशांतर्गत आणि परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर झाली आहे, असे प्रतिपादन राज्यपाल               के. शंकरनारायणन् यांनी आज प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात केले.
          प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिन सोहळा आज शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता. सकाळी सव्वा नऊ वाजता राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, महापौर श्रद्धा जाधव, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, पोलीस महासंचालक के. सुब्रम्हण्यम्, पोलिस आयुक्त अरुप पटनाईक आदींसह लोकप्रतिनिधी, विविध देशांचे राजदूत, लष्करी दल, पोलीस विभाग आणि अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
          राज्यातील जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात राज्यपाल म्हणाले की, लोकशाही चौकटीत राहूनही भारतासारखा विकसनशील देश आर्थिक महासत्ता बनू शकतो, हे आपण दाखवून दिले आहे. राज्याच्या सर्वेकष विकासासाठी लोकशाहीची ही वीण अधिक मजबूत करण्याची गरज आहे.
          सामाजिक आणि भौतिक सुविधा तसेच प्रशासन सुधारण्यासाठी शासनाने अनेक उपाययोजना आखल्या असून सर्वस्तरावर प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यामुळे प्रशासनात सुधारणा होण्याबरोबरच जबाबदारी आणि पारदर्शकता येईल व याचे लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविले जातील, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
          महाराष्ट्राने  12 व्या पंचवार्षिक योजनेत महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट्ये ठेवली आहेत. राज्याचे सकल विकास उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट्य 11 टक्के प्रस्तावित आहे. ही उद्दिष्ट्ये राज्य नक्कीच साध्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  
          नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली असून दहशतवादाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शासनाने पोलीस दलाला अत्याधुनिक शस्त्रे दिली आहेत. मात्र पोलीस यंत्रणेच्या या प्रयत्नांना जनतेच्या सहकार्याबरोबरच जनतेने जागरुकता दाखविणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          राज्यपाल म्हणाले की, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांची प्रक्रिया राज्यात सध्या सुरु आहे. या लोकशाही प्रक्रियेतून स्थानिक स्वराज्य संस्थावरील विश्वास आणि बांधिलकी व्यक्त होते. जनतेने शांततापूर्ण मार्गाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मूल्यांची जोपासना करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
          राज्यपाल यांच्या भाषणाचा मराठी अनुवाद गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी वाचून दाखविला.
          यावेळी झालेल्या संचलनात भारतीय नौदल, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 8, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 11, मुंबई सशस्त्र पोलीस दल, मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई रेल्वे पोलीस दल, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, सशस्त्र होमगार्ड (पुरुष/महिला), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल (पुरुष/महिला),  मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सी.कॅडेट कोअर (मुले/मुली),     आर. एस. पी. (मुले/मुली), ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग (चित्ररथ) तसेच कोळी नृत्य, नाशिक जिल्ह्याचे सोंगी मुखवटे नृत्य, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नृत्य आणि लावणी आदी पथकांनी भाग घेतला.
          बृहन्मुंबई वाहतूक पोलीस विभागाचे 40 मोटर सायकल पथक, नौदलाचे जमिनीवरुन हवेत तसेच जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्र, पोलीस दलाची आर.आय.व्ही.वाहन, रक्षक वाहन, मार्क्समॅन वाहन, महारक्षक वाहन, नागरी संरक्षण दलाची  रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहन, सेंट जॉन ॲम्बुलन्सची रुग्णवाहिका तसेच मुंबई अग्निशमन दलाचे रेस्क्यु वाहन व फिरत्या मंचकाची शिडी यांनी देखिल यावेळी झालेल्या संचलनात भाग घेतला.
000

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण



         मुंबई, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील राजभवन येथे ध्वजारोहणाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यपाल के.शंकरनारायणन् यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
          आज सकाळी आयोजित ध्वजारोहण सोहळ्यास राज्यपालांच्या पत्नी श्रीमती राधा शंकरनारायणन् तसेच राजभवनचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस पथकातर्फे राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राज्यपालांनी राजभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
0000

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

प्रजासत्ताक दिनाची शिवाजी पार्क येथे रंगीत तालीम



          मुंबई, दि. 24 : प्रजासत्ताक दिनाचा 62 वा वर्धापन दिन सोहळा 26 जानेवारी 2012 रोजी शिवाजीपार्क येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्याची रंगीत तालीम शिवाजी पार्क, दादर येथे आज आयोजित करण्यात आली होती.
            राष्ट्रध्वज वंदन व संचलन सोहळ्याच्या रंगीत तालमीस राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, अप्पर पोलीस महासंचालक के. के. पाठक, विशेष पोलीस महानिरिक्षक हेमंत नगराळे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, सह मुख्य राजशिष्टाचार अधिकारी शैलेश बिजूर तसेच पोलीस विभागाचे व अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            भारतीय नौदल, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 8, राज्य राखीव पोलीस बल क्रमांक- 11, मुंबई सशस्त्र पोलीस दल, मुंबई दंगल नियंत्रण पथक, मुंबई रेल्वे पोलीस दल, बृहन्मुंबई महिला पोलीस दल, सशस्त्र होमगार्ड (पुरुष/महिला), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, राज्य उत्पादन शुल्क, नागरी संरक्षण दल (पुरुष/महिला), मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सी.कॅडेट कोअर (मुले/मुली), आर. एस. पी. (मुले/मुली), ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक आरोग्य विभाग  (चित्ररथ) तसेच कोळी नृत्य, नाशिक जिल्ह्याचे सोंगी मुखवटे नृत्य, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नृत्य आणि लावणी या पथकांनी संचलनात सहभाग घेतला होता.
            1 मे 2011 रोजी महाराष्ट्र राज्याच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त उत्कृष्ट संचलन करणाऱ्या राज्य राखीव पोलीस बल गट - 8 कंपनी क्र. 1 (प्रथम क्रमांक), राज्य राखीव पोलीस बल क्र. 8 कंपनी क्र. 2 (द्वितीय क्रमांक), राज्य राखीव पोलीस बल क्र. 11 (तृतीय क्रमांक) या पथकांना यावेळी गौरविण्यात आले.
0 0 0 0

उमलू द्या कळ्यांना



बाप म्हणे लेकी  तु गं साखरेचं पोतं. . .
परि तुझ्या नशिबाला जामीन कोण होतं ? असं समजून मुलीच्या जन्माचा जामीन नाकारण्याच्या वृत्तीमुळे आज सामाजिक विषमतेची दरी रुंदावतांना दिसत आहे.
            जणगणना 2011 मधून स्पष्ट झालेलं वास्तव समजून घ्यायचे असेल तर यातील सांख्यिकीय माहितीकडे केवळ आकडेवारी म्हणून आपल्याला आता दुर्लक्ष करता येणार नाही. यातून स्पष्ट होणारी सामाजिक विषयमतेची दरी आणि त्यातून भविष्यात निर्माण होणारा गंभीर सामाजिक प्रश्न याकडे आपल्याला आत्ताच लक्ष द्यावे लागेल.
            काय आहे वास्तव जाणून घेऊया !
            जणगणना 2011 प्रमाणे भारताची लोकसंख्या 1,210,193,422 इतकी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 623,724,248 तर स्त्रियांची लोकसंख्या 586,469,174 इतकी आहे. यामध्ये 1 हजार पुरुषांमागे महिलांचे प्रमाण 940 आहे.  यातील ग्रामीण महिलांचे प्रमाण 947 तर शहरी भागातील महिलांचे प्रमाण 926 इतके आहे.
            देशामध्ये केरळ राज्य हे लिंग गुणोत्तर सर्वात वरच्या स्थानावर असून तिथे 1 हजार पुरुषांमागे 1084 महिला आहेत. येथे ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण 1077 आणि शहरी भागात 1091 इतके आहे. चंदिगढ च्या ग्रामीण भागात हे प्रमाण 691 इतके कमी आहे तर दमन आणि दीव मध्ये  नागरी भागात लिंग गुणोत्तराचे प्रमाण देशात सर्वात कमी असून ते 1 हजार पुरुषांमागे 550 स्त्रिया इतके आहे. देशातील आठ राज्यांनी ग्रामीण भागात लिंग गुणोत्तराच्या प्रमाणात घट दर्शिवली असून यामध्ये जम्मू-काश्मिर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र कर्नाटक, आणि लक्षद्वीप या केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे तर दादरा नगर हवेली या केंद्र शासित प्रदेशांने ही नागरी भागात स्त्रियांच्या प्रमाणात घट दर्शविली आहे.
            2011 च्या जनगणनेमध्ये शून्य ते सहा या वयोगटातील बालकांच्या लिंग गुणोत्तरात लक्षवेधी घट       झाल्याचे दिसून आले आहे.2001 च्या जणगणनेनुसार देशात  या वयोगटात 1 हजार मुलांमागे 927 मुली होत्या. त्यामध्ये ग्रामीण भागातील मुलींचे प्रमाण 934 इतके होते तर शहरी भागातील मुलींचे प्रमाण 906 इतके होते. 2011 मध्ये 1 हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमी होऊन 914 इतके झाले आहे. यामध्ये ग्रामीण भागातील प्रमाण 919 तर शहरी भागातील प्रमाण 902 इतके आहे.
            म्हणजेच ग्रामीण भागात या वयोगटातील मुलींची घट ही 15 पॉईंटची आहे तर शहरी भागात ही घट  4 पॉइंटची आहे. मागील दशकात म्हणजे 2001 ते 2011 मध्ये 1 हजार बालकांमागे दिल्ली राज्यात  ग्रामीण भागात मुलींची संख्या सर्वात कमी झाली असून ती 809 इतकी आहे तर नागालँडमध्ये नागरी क्षेत्रात या वयोगटात लिंग गुणोत्तराचे सर्वात अधिक प्रमाण नोंदविण्यात आले असून ते 1 हजार मुलांमागे 979 इतके आहे. 
महाराष्ट्राची ग्रामीण आणि शहरी भागातील स्थिती समजून घ्यायची असेल तर आपल्याला 2011 च्या जनगणनेनुसार समोर आलेली आकडेवारी अभ्यासावी लागेल.


                                                                                                                                     ..2/-
उमलू द्या कळ्यांना..                                          : 2 :

या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या एकूण 11,23,72,972 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण 6,15,45,441 तर शहरी भागाची लोकसंख्या 5,08,27,531 इतकी आहे. यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5,83,61,379 इतके आहे. ती ग्रामीण भागात 3,15,93,580 इतकी आहे तर शहरी भागात 2,67,67,817 इतकी आहे. राज्यात महिलांची एकूण लोकसंख्या 5,40, 11,575 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांची लोकसंख्या 2,99,51,861 तर शहरी भागातील महिलांची लोकसंख्या 2,40,59,714 इतकी आहे.
दशकामध्ये राज्याच्या लोकसंख्येत 15.99 टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागाची टक्केवारी 10.34 तर शहरी भागाची 23.67 टक्के इतकी आहे.या वाढीत पुरुषांची टक्केवारी  15.80 तर महिलांची टक्केवारी 16.21 टक्क्यांची आहे.
राज्यात शून्य ते सहा वयोगटात एकूण लोकसंख्या 1,28,48,375 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या 74,45,853 तर शहरी भागातील लोकसंख्या 54,02,522 इतकी आहे.
यामध्ये मुलांची एकूण लोकसंख्या 68,22,262 इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लोकसंख्या 39,61,420 तर शहरी भागातील लोकसंख्या 28,60,842  इतकी आहे.
यामध्ये मुलींची एकूण लोकसंख्या 60,26,113 इतकी आहे. ग्रामीण भागातील या वयोगटातील मुलींची लोकसंख्या 34,84,433 तर शहरी भागातील लोकसंख्या 25,41,680 इतकी आहे.
महाराष्ट्राची एकूण साक्षरतेची टक्केवारी 82.91 टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण 77.09 तर शहरी भागाचे प्रमाण 89.84 टक्के इतके आहे.
एकूण साक्षरतेत पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी 89.82 टक्के इतकी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील पुरुषांची साक्षरतेची टक्केवारी 86.39 तर शहरी भागातील साक्षरतेची टक्केवारी 93.79 टक्के इतकी आहे.
एकूण साक्षरतेत महिलांची साक्षरतेची टक्केवारी 75.48 टक्के इतकी असून यामध्ये ग्रामीण भागाचे प्रमाण 67.38 टक्के तर शहरी भागाचे प्रमाण 85.44 टक्के इतके आहे.
          राज्यातील 1991 ते 2011 लिंग गुणोत्तराचे प्रमाण
                 (एक हजार पुरुषांमागे महिला )

1991
2001
2011
एकूण
934
922
925
ग्रामीण
972
960
948
शहरी
875
873
899

             राज्यातील 1991 ते 2011  लिंग गुणोत्तराचे प्रमाण
             (शून्य ते सहा वयोगट एक हजार मुलांमागे मुली  )

1991
2001
2011
एकूण
946
913
883
ग्रामीण
953
916
880
शहरी
934
908
888

                                                                                                                                                 3/-

उमलू द्या कळ्यांना..                                                      : 3 :

            या आकडेवारीचा अभ्यास केला तर असे दिसून येते की, 1991 ते 2011 या कालावधीत महिलांच्या प्रमाणात दर हजार पुरुषांमागे 934 वरून 925 इतकी घट झाली आहे तर शून्य ते सहा या वयोगटात याच कालावधीत 1 हजार मुलांमागे 946 वरून 883 इतकी मुलींची लक्षणीय घट झाली आहे.
महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात टॉपचे  पाच जिल्हे
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
रत्नागिरी
1,123
1,146
1,013
2
सिंधुदूर्ग
1,037
1,046
981
3
गोंदिया
996
998
984
4
सातारा
986
993
955
5
भंडारा
984
984
982

महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे  पाच जिल्हे
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
मुंबई
838
---
838
2
मुंबई उपनगर
857
---
857
3
ठाणे
880
954
859
4
पुणे
910
927
899
5
बीड
912
909
926

महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात टॉपचे  पाच जिल्हे (शून्य ते सहा वयोगट )
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
गडचिरोली
956
961
918
2
चंद्रपूर
945
958
919
3
गोंदिया
944
947
927
4
रत्नागिरी
940
942
928
5
भंडारा
939
944
915
महाराष्ट्र  :  लिंग गुणोत्तरात सर्वात खालचे  पाच जिल्हे शून्य ते सहा वयोगट )
अ.क्र
जिल्हा
एकूण महिलांचे प्रमाण
ग्रामीण भाग
शहरी भाग
1
बीड
801
789
848
2
जळगाव
829
830
827
3
अहमदनगर
839
837
848
4
बुलढाणा
842
841
847
5
कोल्हापूर
845
842
852

ही आकडेवारी पाहिली तर देश आणि राज्यातील लिंग गुणोत्तराचे प्रमाण लक्षात येते. याचा समिक्षात्मक अभ्यास केला तर पुरुषांच्या तुलनेत महिलांचे आणि शून्य ते सहा वयोगटात मुलांच्या तुलनेत मुलींचे दर हजारी प्रमाण कमी होत असून ती चिंतेची बाब आहे.सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढू द्यायची नसेल तर सावधान ! आत्ताच या गोष्टीला गांभीर्याने घेऊन पाऊले उचलण्याची गरज आहे.
            असं का? याचं उत्तर शोधण्याची आता खरी वेळ आलीय. खरचं मुला-मुलीत फरक असतो? कुठल्या क्षेत्रात मुली, मुलांच्या तुलनेत मागे आहेत?  आज किती आई-वडील मुलांपेक्षा मुलींकडे जास्त राहातात किंवा किती मुली आई वडीलांचा म्हतारपणाचा आधार झाल्या आहेत हे जर पाहिलं तर अनेक लोकांकडे, कुटुंबाकडे याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळतील.                       
              बचतगटातील महिलांपासून अवकाशात भरारी घेणाऱ्या अंतराळवीरांपर्यंत मुलींनी विविध क्षेत्रात मिळवलेलं  यश पाहिले तर मुला-मुलीत करण्यात येत असलेला भेदभाव किती तकलादू आहे हे लक्षात येतं. सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेत महिलांना सहभागी करून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे आता सगळ्यांना पटू लागलं आहे.  महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला स्त्री शिक्षण आणि स्त्री समानतेची फार मोठी परंपरा लाभली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंपासून अलिकडच्या काळात मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्रा यांच्यापर्यंत महिलांचे काम पाहिले तर महिलांनी कौटुंबिक विकासाबरोबर सामाजिक विकास आणि सामाजिक सुरक्षिततेसाठी दिलेलं योगदान लक्षवेधी ठरतं.
     अलिकडच्या काळात शासनासमवेत अनेक स्वयंसेवी संस्था सक्रीयपणे स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी योगदान देताना दिसत आहेत. यामध्ये पहिलं ताट तिला, चला मुलींचे स्वागत करू या,  नकोशी होतेय हवीशी, राखीसाठी बहीण हवी यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचीही राज्यात अंमलबजावणी सुरु आहे. परंतु सर्व प्रश्न कायद्याने सुटतात असं अजिबात नाही. त्यासाठी गरज आहे ती मानसिकता बदलाची.
    गावात नदी आणि घरात मुलगी असायलाच हवी अशी जुनी जाणती माणसं नेहमी म्हणायची. नदी हे जीवनाचं, समृद्धीचं प्रतीक तर घरात मुलगी असणं हे हासू-आसू, फॅशन,कला-साहित्य-संस्कृती, नाविन्य, नात्यातल्या जिव्हाळ्याचा रेशीमबंध जिवंत असल्याचं प्रतीक. म्हणनूच तर  घरात मुलगी झाली तर लई         झाल्या लेकी नको म्हणू बापा, उडूनिया जाईल तुझ्या चिमण्यांचा ताफा. . . असं सांगून ही माणसं मुलीच्या जन्माचं स्वागत करायला लावायची. आज पुन्हा हीच संस्कृती, हाच विचार समाजमनात रुजवायचा असून मुलीच्या जन्माचं स्वागत करायचंय. . . कळ्यांना अवेळी खुडण्याआधी पूर्ण उमलू द्यायचंय. राष्ट्रीय बालिकादिनाच्या निमित्ताने आपण ही शपथ घेऊया !
= = =