खाजगी
विना अनुदानित व कायम विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये
प्रवेश घेणाऱ्या सामाजिक मागास व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काची
प्रतिपूर्ती करण्याबाबतची योजना शैक्षणिक वर्ष 2012-13 करिता व त्यापुढील कालावधीसाठी
काही सुधारणांसह सुरु ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला.
शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण
व औषधी द्रव्ये विभाग, कृषि विभाग, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विकास
विभाग या विभागांतर्गत ही योजना राबविली जाते. मंत्रिमंडळाने खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून या प्रस्तावाला
मान्यता दिली
(1) सर्व सामाजिक
मागास घटकातील (SC/ST/VJNT/OBC/SBC) तसेच आर्थिक दुर्बल घटकातील (EBC) विद्यार्थ्यांसाठी
त्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची अट रुपये 2 लक्ष एवढी राहील.
(2)
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे
100 टक्के फी प्रतिपूर्ती देय राहील.
(3)
VJNT/OBC/SBC आणि EBC घटकातील विद्यार्थ्यांना प्रस्तावातील परिशिष्ट
अ मध्ये नमूद केलेल्या रकमेएवढी फी प्रतिपूर्ती देय राहील.
(4)
ही
योजना कुटुंबातील केवळ दोन अपत्यांनाच लागू राहील. तथापि, दोन अपत्यांमध्ये दोन्ही
मुलींचा समावेश असल्यास दोन्ही अपत्यांना या योजनेचा लाभ होईल. दोन अपत्यांमध्ये एक
मुलगा आणि एका मुलीचा समावेश असल्यास दोन्ही अपत्यांना या योजनेचा लाभ होईल. या दोन अपत्यांमध्ये दोन मुलांचा
समावेश असल्यास केवळ एकाच अपत्याला या योजनेचा लाभ मिळू शकेल.
ही
योजना ही उपरोक्त अटींसह शैक्षणिक वर्ष 2012-13 मध्ये आणि त्यापुढील कालावधीत प्रवेश
घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील. तथापि, शैक्षणिक वर्ष 2011-12 पर्यंत प्रवेशित
विद्यार्थ्यांना (जुन्या विद्यार्थ्यांना) पूर्वीचीच योजना लागू राहील.
00000