गुरुवार, ४ जून, २०१५

ग्रामस्थांनी शासनाचे विविध उपक्रम राबविण्यासाठी सहभाग घ्यावा उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे पर्यावरण सप्ताहांतर्गत साक्री तालुक्यातील धमनार येथे वृक्ष लागवड



धुळे, दि. 4 :-लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ दि. 3 ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताहास प्रारंभ झाला.  पर्यावरण सप्ताहानिमित्त साक्री तालुक्यातील धमनार येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात वृक्षारोपण कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत साक्री तालुक्यातील धमनार येथील लोकसहभागातून करण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांच्या कामांची पाहणी  श्री. विठ्ठल सोनवणे यांनी केली.  त्यांचे समवेत जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, सरपंच भिलाजी सोनवणे, माजी सरपंच वसंतराव खैरनार, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
 त्यानिमित्त महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवड झालेल्या गावांसह, प्राथमिक, माध्यमिक शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे, समाजमंदिर, गावठाण, गायरान जमिनी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड  करण्यात येत आहे.  या शासनाच्या विविध उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. विठ्ठल सोनवणे यांनी यावेळी केले. 

000000

विभागीय लोकशाही दिन 08 जून रोजी निवेदन दाखल करण्याबाबत जनतेस जाहिर आवाहन

नाशिकरोड दि. 03 : प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार जून महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दिनांक 08 जून, 2015 रोजी विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड, नाशिक येथे सकाळी 11.00 वाजता करण्यात आले आहे. या लोकशाही दिनाचे अर्ज नोंदणी करणे व त्यानुसार टोकन देणे बाबतचे कामकाज सकाळी  10.00 वाजता सुरू होईल.
            विभागीय लोकशाही दिनात तक्रारी/निवेदन स्विकारण्यासाठी संबंधीत तक्रारीवर जिल्हास्तरीय लोकशाही दिनात करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत अर्जदार समाधानी नाही याबाबतची कारणे अर्जात नमुद करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनात दिलेल्या निवेदनाची, टोकनाची व लोकशाही दिनाच्या उत्तराची प्रत सोबत जोडावी लागेल. जिल्हास्तरावरील लोकशाही दिनातील अर्जाचे अनुषंगाने दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यास किंवा दोन महिन्यात उत्तर प्राप्त न झाल्यास विभागीय स्तरावरील लोकशाही दिनी तक्रार करता येईल. तथापि, आस्थापना विषयक बाबीसंबधीच्या न्यायीक बाबींवरील तक्रारी स्विकारल्या जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी  विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिकरोड येथे संपर्क साधावा असे  विभागीय आयुक्त,  नाशिक विभाग, नाशिक यांनी कळविले आहे.       
---000---

जनतेच्या जिव्हाळ्याच्या सेवांचा सेवा हमी कायद्यात समावेश करावा - मुख्यमंत्री

मुंबई, दि.2: सेवा हमी कायद्यामध्ये जनतेच्या जिव्हाळ्याच्या सेवांचा जास्तीत जास्त समावेश करावा तसेच सर्व विभागांनी येत्या दहा दिवसात दिल्या जाणाऱ्या सेवांबाबतचे फॉरमॅट तयार करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
            सेवा हमी अध्यादेशाबाबत मंत्रालयात सर्व सचिवांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले की, सेवा हमी अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर जनतेची कामे होत नाहीत अशी ओरड येता कामा नये. यासाठी विभागांनी आपल्यामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांच्या सूचीमध्ये प्रामुख्याने जनतेला देण्यात येणाऱ्या थेट सेवांचा समावेश कारावा. ह्या सेवा जनतेला मिळवून देण्यासाठी करावयाच्या अर्ज प्रक्रियेत सुलभता आणावी. विभागांनी कमीत कमी दहा सेवा या कायद्यामार्फत देण्यासाठी प्रयत्न करावा. विविध सेवा मिळविण्यासाठी भराव्या लागणाऱ्या अर्जांचे कालबाह्य फॉरमॅट बदलून ते सुलभ करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
            सामान्यांचा अधिक संपर्क हा महसूल आणि नगरविकास या दोन विभागांशी येत असतो. या विभागांनी जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करावा. जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचण येता कामा नये. त्याचबरोबर नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र एकदा मिळाल्यास त्याची वैधता तीन वर्षांपर्यंत करता येईल काही बाब तपासून त्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तसा निर्णय झाल्यास विद्यार्थ्यांसाठी तो खुप लाभदायी होऊ शकतो आणि सामान्य जनतेला वारंवार शासकीय कार्यालयात फेऱ्या देखील मारण्याची गरज भासणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
            राज्यामध्ये प्रशासकीय यंत्रणांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे भक्कम असून जनतेला तातडीने सेवा देण्यासाठी प्रशासनाने सज्ज व्हावे,असे मुख्य सचिव श्री. स्वाधीन क्षत्रिय यांनी यावेळी सांगितले.
0000

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय लवकरच -मुख्यमंत्री

मुंबई, दि. : शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात जुन्या कर्जाचे व्याज भरावे लागणार नसून कर्जमाफी संदर्भात  15 जून पर्यंत निर्णय घेण्यात येईल अशी,  ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने भेट घेतली.  यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार सर्वश्री सुनिल तटकरे, राजेश टोपे, राणा जगजित सिंह, विक्रम काळे, जयदत्त क्षीरसागर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उपस्थित होते.  
मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी व  पीक विमा संदर्भात सर्वात जास्त 350 कोटींचा निधी बीड जिह्याला उपलब्ध करुन दिला जाणार असून त्यामुळे  अतिरिक्त भार  सरकारवर पडणार आहे. तसेच जलयुक्त शिवार कार्यक्रमात विविध योजनांच्या माध्यमातून विविध कामे पार पाडली जाणार आहेत. शेतकऱ्यांना दूध दरवाढी संदर्भात सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
 माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने यावेळी मुख्यमंत्र्यांना विविध मागण्या मांडण्यात आल्या.  मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी, फळबाग वाचविण्यासाठी हेक्टरी 35 हजार रुपये देण्यात यावे, साखरेच्या एफआरपीबाबत निर्णय घेण्यात यावा, धनगर समाज आरक्षण इत्यादी विषयांवर चर्चा झाली.
०००

बुधवार, ३ जून, २०१५

लळींग कुरणात लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीवन उभे करणार : जिल्हाधिकारी लळींग कुरणात वृक्षारोपण करून पर्यावरण सप्ताहाचा प्रारंभ

धुळे, दि. 3 :- लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी लळींग कुरणामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे स्मृतीवन उभे करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ 3 ते 9 जून या कालावधीत राज्यात पर्यावरण सप्ताह साजरा करण्यात येत आहे.  त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्या हस्ते लळींग कुरणामध्ये वृक्षारोपण करून सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला.  त्याप्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते.  यावेळी उपवनसंरक्षक  डी. यु. पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनणे (धुळे), उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, लळींगचे माजी उपसरपंच संभाजी गवळी, उपसरपंच गोविंद गवळी, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, निवासी नायब तहसिलदार अरूण शेवाळे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर एस. एम. पाटील, प्रदीप शिरोडे, शरद गढरी आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, गोपीनाथराव मुंडे यांचे राज्यासाठीचे व देशासाठीचे योगदान विचारात घेता त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दरवर्षी 3 ते 9 जून या कालावधीत पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
या पर्यावरण सप्ताहामध्ये संपूर्ण जिल्ह्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम मनरेगा अंतर्गत हाती घेण्यात आला असून यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेल्या गावात वृक्षारोपण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.   वृक्ष लागवडीचा हा कार्यक्रम प्राथमिक, माध्यमिक शाळा, आंगणवाडया, आरोग्य केंद्रे, समाज मंदिर, गावठाण, गायरान, ग्रामपंचायतीच्या जमिनी, शासकीय व निमशासकीय कार्यालये व रस्त्याच्या दुतर्फा करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

000000

शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते योग्य दरात उपलब्ध करा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 2 :-शेतकऱ्यांना योग्य प्रमाणात, योग्य दरात आणि योग्य वेळी बी-बियाणे, खते

उपलब्ध करण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खताची आढावा बैठक आयोजित

करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी

अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा

परिषदेचे कृषि विकास अधिकारी बी. व्ही. बैसाणे, धुळे रेल्वे स्टेशनचे स्टेशन मॅनेजर एस. जे.

महाजन, पंचायत समिती कृषि अधिकारी आर. एस. चौधरी (धुळे), ए. एन. कौर (शिरपूर), जिल्हा

मार्केटिंग अधिकारी बी. आर. प्रबोधनकार, आर.सी.एफ. चे विजय बाविस्कर,  विशाल नवले,

पुरवठादार, कंपनी प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना सहकारी सोसायटया मार्फत बांधावर खते उपलब्ध  करण्यासाठी कृषि

विभागाची महत्वाची भूमिका असल्याचे सांगून जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की,

दरमहा सप्टेंबर पर्यंत खतांचा व्यवस्थित पुरवठा नियोजन बध्द पध्दतीने करण्यात यावा. खतांचा

काळाबाजार व  गैरप्रकार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील,  खेडयापाडयातून खत

पुरवठा करण्याची व्यवस्था उत्पादक कंपन्यांनी करावी, जेणे करून शेतकऱ्यांना सहज व

जवळच्या ठिकाणी  खते उपलब्ध होतील, असेही त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, धुळे हा कृषि प्रधान जिल्हा

आहे.  बहुसंख्य लोकांचा व्यवसाय शेती हाच आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे  सहज

उपलब्ध झाली पाहिजेत.   खत पुरवठादार व उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रत्येक भागात

व्यवस्थीत खत पुरवठा करावा.  सोसायटयामार्फत व शेतकरी संघा मार्फत खत पुरवठा केल्यास

त्यात पारदर्शकता राहू शकते.  शेतकऱ्याला जे खत पाहिजे तेच खत दिले पाहिजे, असेही त्यांनी

यावेळी सांगितले.

धुळे जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा आहेत.  या सीमेवरून बनावट खते येण्याची

शक्यता आहे.  या बनावट खतांमुळे शेतकऱ्यांची मोठया प्रमाणावर फसवणूक करण्यात येते

त्यामुळे यंत्रणांनी दक्ष राहून बनावट खत जिल्ह्यात येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे.

बनावट खत विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी

सांगितले.

गोंदूर गावाच्या विकासासाठी परिपूर्ण विकास आराखडा तयार करावा -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 2 :-गोंदूर गावाच्या विकासाच्या दृष्टीने परिपूर्ण विकास आराखडा तयार करून यंत्रणा प्रमुखांनी विकास कामांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी  केले.
            सांसद आदर्शग्राम जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, यशदाचे सोनार, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी एस. बी. तोरणे, गट विकास अधिकारी जी. ए. पाटील, जिल्हा माहिती अधिकारी ज्ञानेश्वर इगवे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, सरपंच सखाराम पाटील, आदी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ म्हणाले की, यंत्रणांनी प्रत्यक्ष सर्वेक्षण करून कामांना सुरूवात करावी.  आदर्श गाव म्हणजे त्या गावाचा परिपूर्ण विकास होईल अशा पध्दतीने केलेले काम होय.  गावांच्या मागणी प्रमाणे विकास आराखडा तयार करणे आवश्यक असून निधीच्या उपलब्धतेनुसार प्रत्येक प्रकल्प परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.  गोंदूर गावची ऑक्टोबर-2016 पर्यंत विकास कामे पूर्ण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
            यावेळी सांसद आदर्श ग्राम गोंदूर गावातील विकास आराखडयाचा आढावा घेण्यात आला.  त्यात नवीन प्रस्तावित करण्यात आल्यानुसार गावात सांडपाणी व्यवस्थापनासाठी पी.व्ही.सी. पाईप गटार करणे व सांडपाणी अंतिम व्यवस्था करणे, गावात घनकचरा व्यवस्थापनासाठी गावातील मुख्य चौकात कचरा कुंडया ठेवणे व कचरा गावाबाहेर टाकण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था करणे, गावात संपूर्ण दारूबंदी करणे,  पिण्याच्या पाण्यासाठी जलशुध्दीकरण केंद्र व पाईपलाईन करणे, गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण केल्याने गावात चिखल होणार नाही परिणामी स्वच्छता राखली जाईल व आरोग्याची समस्या भेडसावणार नाही  आणि वाहतूक सुखकर होईल, गाव शिवारातील रस्ते मुरमीकरण व खडीकरण करणे, संपूर्ण गाव खडकावर वसल्यामुळे वैयक्तिक शौचालयाला अडचण निर्माण होते.  त्यामुळे इतर कुटुंबासाठी सार्वजनिक शौचालय बांधल्याने गाव निर्मल होण्यास मदत होईल, गावाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग दिसून येत नाही.  महिलांचा सहभाग वाढल्याने गाव विकासाला चालना मिळेल, लोंढानाल्यावर सिमेंट  बांध बांधल्याने परिसरातील जमिन ओलिताखाली येण्यास मदत होईल व बागायती क्षेत्रात वाढ होईल, लोंढानाल्यावरील जुन्या सिमेंट नालाबांधाचा गाळ काढून खोलीकरण केल्याने पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल व शिवारातील विहीरींना त्याचा लाभ होईल, गावातील शिवारातील विजवाहक तारा जिर्ण झाल्यामुळे गावात व शिवारात विजेची समस्या निर्माण होते तारा बदलल्यामुळे शेतीला वीज पुरवठा होऊन शेती बागायतीला चालना मिळेल, ई-लर्निंगच्या माध्यमातून मुलांची शिक्षणाची आवड निर्माण होईल व अध्ययन ग्रहण क्षमतेत वाढ होईल परिणामी गुणवत्ता विकास साध्य होईल, गावातील स्त्री भ्रृण हत्येला प्रतिबंध केल्याने समाजातील मुलींचे प्रमाण वाढेल, युवकांना व्यायामाच्या सवयी निर्माण होऊन ते शारिरीकदृष्टया सक्षम होतील, गावात महिला व पुरूषांचे गट निर्माण केल्याने गावात संघटन व एकता निर्माण होईल, गावालगतच्या नाल्यामुळे गावात दुर्गंधी पसरते त्यामुळे नाला खोलीकरण करून बंदिस्त झाल्याने गावाच्या सांडपाण्याचा प्रश्न सुटेल व स्वच्छता राहील.

00000000