शनिवार, २९ ऑगस्ट, २०१५

त्र्यंबकेश्वर येथे भक्तीमय उत्साहात शाहीस्नान


श्रीक्षेत्र  त्र्यंबकेश्वर, दि.29: सिंहस्थ कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीतील शाहीस्नान आज पहाटे येथे भक्तीपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडले. या पर्वणीत देशभरातून आलेल्या विविध मानाच्या आखाड्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत व असंख्य भाविकांनी स्नान केले. उत्साहाने भारलेल्या या सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी दिपेंद्रसिंह कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले सुक्ष्म नियोजन आणि जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संजय मोहीते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलाने ठेवलेला चोख बंदोबस्त यामुळे शाही स्नान शांततेच्या आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाले.
पहाटे 4 वाजेच्या सुमारास शाही स्नानास प्रारंभ झाला. हर हर महादेवचा जयघोष करत आणि विविध वाद्यांच्या गजरात विविध आखाडे मिरवणुकीने कुशावर्तात दाखल होत होते. आपापल्या मानानुसार विविध आखाड्यांनी त्यांचे प्रमुख, साधू, संत, महंत यांच्यासह उपस्थिती लावून कुशावर्तातील कुंडात शाहीस्नान केले. प्रशासनाने यासाठी पाणी, प्रकाश व्यवस्था, आखाड्यांचे आगमनाचे आणि परतीचे मार्ग, जीवरक्षक दल, पोलीस बंदोबस्त, वाहतूक नियंत्रण, प्रसार माध्यमांची व्यवस्था अशी सर्व बाजूंनी चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे साधुंना निर्विघ्नपणे शाहीस्नानाचा विधी पूर्ण करता आला. 
श्री. शंभू पंचदशनाम जुना आखाडा (निलपर्वत) यांची मिरवणूक गुरुगद्दी रमता पंच छावणी येथून निघाली. त्यापाठोपाठ श्री. पंचदशनाम आवाहन आखाड्याचे आणि त्यानंतर पंच अग्नी आखाड्याच्या साधु, महंतांची मिरवणूक निघाली. आजच्या सिंहस्थ पर्वातील ही पहिली शाही मिरवणूक होती. पिंपळंद शिवारातून या मिरवणूकांना प्रारंभ झाला. दुसऱ्या शाही मिरवणूकीत श्री. तपोनिधी निरंजनी आखाडा, श्री. तपोनिधी पंचायती आनंद आखाडा या दोन आखाड्याच्या साधु महंतांनी  सहभाग घेतला. तिसऱ्या शाही मिरवणूकीत श्री. पंचायती महानिर्वाणी आखाडा, श्री. शंभू पंचायती अटल आखाडा या आखाड्याच्या साधु महंतांनी सहभाग घेतला. त्यात प्रथम श्री. पंचादश जुना आखाडा, आवाहन आखाडा, श्री. पंचायती अग्नी आखाडा, श्री. पंचायती निरंजनी आखाडा, श्री. पंचायती आनंद आखाडा, श्री. पंचायती महानिर्वाण आखाडा, श्री. पंचायती अटल आखाडा यांनी या वेळी शाहीस्नानाची पर्वणी साधली. त्यानंतर श्री. पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री. पंचायती नवा उदासीन आखाडा आणि  श्री. निर्मल पंचायती आखाड्याच्या साधुंनी मिरवणूक काढली. श्री. पंचायती बडा उदासीन आखाडा, श्री. पंचायती नवा उदासीन आखाडा, श्री. पंचायती निर्मल आखाडा यांनी शाहीस्नान केले. दुपारी 12 वाजल्यानंतर  सर्वसामान्य भाविकांना शाहीस्नानासाठी सोडण्यात आले.या मिरवणूकी दरम्यान सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त होता. भाविकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने केलेल्या चोख आणि परिपूर्ण तयारीने कोणताही अनुचित प्रकार न घडता यंदाच्या सिंहस्थातील पहिले शाहीस्नान शांततेत व भक्तीभावपूर्ण वातावरणात पार पडले.

ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई दि 28:  ग्रंथपाल संचालनालयामार्फत दरवर्षी जून महिन्यात घेण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षेच निकाल जाहीर करण्यात आला आहे. जून 2015 मध्ये राज्यातील 27 जिल्हास्तरीय केंद्रामधून एकूण 1 हजार 539 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी 1 हजार 21 विद्यार्थी उत्तीर्ण व 518 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. परीक्षेच्या निकालाची टक्केवारी 66.34 इतकी आहे. राज्यात सर्वाधिक निकाल रत्नागिरी केंद्राचा 92.86 आणि सर्वांत कमी निकाल परभणी केंद्राचा 7.89 टक्के लागला आहे.
विभागांमध्ये नागपूर विभागाचा निकाल 80.46%, पुणे विभागाचा निकाल 54.78 टक्के लागला आहे. परीक्षेचा निकाल संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका त्यांच्या केंद्रावर 5 सप्टेंबर 2015 नंतर मिळणार आहेत.
महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनयिम, 1967 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना ग्रंथालय शास्त्राचे प्रशिक्षण देऊन त्यांची परीक्षा घेण्याचे काम ग्रंथालय संचालनालयाचे असते. त्यानुसार दरवर्षी संचालनालयाकडून जून महिन्यात परीक्षा घेण्यात येते. सदर परीक्षेचे वर्ग राज्यातील राज्य/विभाग ग्रंथालय संघांकडून शिफारित केलेल्या जिल्ह्यांतून चालविण्यात येतात.
ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांबाबत फेर गुणमोजणी करावयाची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयास प्रत्येकी दहा रुपये प्रमाणे शुलक आणि अर्ज संबंधित वर्ग व्यवस्थापकांकडे 15 सप्टेंबर 2015 पर्यंत करावेत, असे आवाहन राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी प्रसिध्दीपत्रकादवारे केले आहे.

000

तंटामुक्त गाव मोहीम बातमीदारांना पुरस्कार देण्यासाठी राज्यस्तरीय निवड समिती गठीत

 मुंबई,दि. 28 : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेचे  वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या बातमीदारांना गुणवत्तेनुसार (सन 2013-14) मधील पुरस्कार देण्यासाठी गृह  राज्यमंत्री (ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
या मोहिमेची प्रभावी व यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्यामध्ये पूरक व  प्रबोधनात्मक बातम्यांद्वारे प्रसिध्दी देण्याऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदारांना हा पुरस्कार देण्यात येणार असून जिल्हास्तर, विभागीयस्तर व राज्यस्तरावर प्रत्येकी तीन (3) पुरस्कार देण्यात येणार आहेत.
या राज्यस्तरीय निवड समितीतील सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. अपर मुख्य सचिव (गृह), पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई,प्रधान सचिव (विशेष), गृह विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालकमराठी पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी किरण नाईक, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष चंदन शिरवाळे, दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी संजय बापटदैनिक हिंदुस्थानचे प्रतिनिधी सर्फराज आरजू, तसेच  टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी दैनिकाचे प्रतिनिधी संजीव शिवडेकरतर उपसचिवगृह विभाग (कार्यासन,पोल-15) हे समितीचे सदस्य सचिव आहेत.
००००

शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०१५

बोगस वैद्यकीय व्यवसायीकांवर कारवाई करणार :- जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ


धुळे दि.28 :- बोगस वैद्यकीय व्यवसायिकांबद्दल नागरिकांची तक्रार आल्यास तसेच जे पात्रता नसतांनाही वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर भरारी पथक नेमुन अचानकपणे कारवाई करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिल्या आहेत.
          आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्या संदर्भात जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बैठकीस उपजिल्हाधिकारी श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.एस.पी.भामरे, पोलीस उप अधीक्षक (मुख्या) आय.टी.वसावे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.व्ही.पाटील,महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप पाटील, आर.आर.बाविस्कर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन र.पा.थेटे, सदस्य ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे ॲड.चंद्रकात येशीराव, नाशिक विभाग उपाध्यक्ष ग्राहक पंचायतचे डॉ.योगेश हिम्मतराव सुर्यवंशी, डॉ.व्ही.एस.वानखेडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की वैद्यकीय व्यवसायिकाने ज्या पॅथीचे शिक्षण घेतले आहे.त्याच पॅथीच्या पध्दतीने उपचार करावा,तसेच बोगस आयुर्वेद व औषधा संदर्भात वृत्तपत्रातुन प्रसिध्दी होणा-या फसव्या जाहिराती बंद करण्याच्याही सूचना जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या आहेत.त्याचप्रमाणे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणा-यावर भरारी पथकाची नेमणूक करुन  अचानक धाडी घालण्याच्या सुचनाही यावेळी जिल्हाधिका-यानी दिल्यात.                                 00000

उच्च शिक्षण क्षेत्रात जागतिक श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी राज्याने देशाचे नेतृत्व करावे -सी. विद्यासागर राव

मुंबई, दि. 28 : उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये जागतिक श्रेष्ठत्व मिळविण्यासाठी राज्यातील विद्यापीठांनी दर्जेदार शिक्षण व संशोधनाच्या सहाय्याने देशाचे नेतृत्व करावे, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.
            'उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण: नवी दिशा' या विषयावर उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई विद्यापीठ येथे परीषेदेचे आयोजन करण्यात आले होत त्यावेळी ते बोलत होते. उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर, उच्‍च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. जे.बी. जोशी, तसेच राज्यातील विविध विद्यापीठांचे कुलगुरु, शिक्षण तंज्ज्ञ आदी उपस्थित होते.
            राज्यपाल पुढे म्हणाले की, भारतातील तक्षशिला व नालंदा ही विद्यापीठे फार पुर्वीपासून जागतिक शिक्षणाची केंद्रेहोती. त्याचप्रमाणे राज्यातील विद्यापीठांनी दर्जेदार शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांच्या आशा आणि आकांक्षा पुर्ण करण्याच्या प्रयत्न केला पाहिजे. विद्यापीठात शिक्षण घेतल्यामुळे रोजगाराची खात्री मिळेल या आशेने अनेक गरीब पालक आपल्या मुलांना पैसा खर्च करुन  उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात पाठवितात. आजची विद्यापीठे अशा रोजगाराची खात्री देऊ शकतात का ? याचा विचार करणे गरजेचे आहे. पराकाष्टा, विस्तार, नि:पक्षपातीपणा ही उच्च शिक्षणातील महत्वाची ध्येय आहेत. ही उदिष्टे पुर्ण करण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्न करावेत. राज्यातील कमीत कमी दोन विद्यापीठे जगातील सर्वोत्कृष्ठ शंभर विद्यापीठाच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे देश पातळीवर आणि राज्य पातळीवर देखील विद्यापीठ व महाविद्यालयांनी पुढील काळात आपली गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्या विद्यापीठाने पुढाकार घेऊन परदेशी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन द्याव्यात. पायाभुत सुविधा तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी सुवीधा उपलब्ध करुन देण्यासाठी पुढील पाच वर्षामध्ये कॉर्पोरेट क्षेत्राच्या सहाय्याने 1000 कोटी रुपयांचा अतिरिक्त फंड ऊभा करावा.विद्यापीठाने उद्योजक तसेच नौकरी निर्माण करणारे  विद्यार्थी पुढील काळात घडवावेत अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली.
            उच्च  व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, पुढील दहा वर्षासाठीचा शैक्षणिक विकास आराखडा तयार करण्यासाठी ही परिषद महत्वपूर्ण आहे. राज्यातील विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार करताना विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानयुक्त दर्जेदार  शिक्षण मिळेल याची काळजी घ्यावी. मेक इन महाराष्ट्राच्या माध्यमातून राज्यात मोठी गुंतवणूक होत आहे. यासाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा.  जगातील सर्वोत्तम शिक्षण पध्दती राज्यात येण्याची गरज असल्याचेही श्री. तावडे यांनी यावेळी सांगितले.
            उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर म्हणाले की, पुणे, मुंबई विद्यापीठाप्रमाणे राज्यातील इतर विद्यापीठामध्ये देखील परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी आले पाहिजेत यासाठी इतर विद्यापीठाने प्रयत्न करावेत. ज्येष्ठ शास्त्रज्ञ रुघुनाथ माशेलकर म्हणाले की,  विद्यापीठांनी प्रथम स्वत:ला  सक्षम बनवून नंतरच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी  करार करावा. भारतामध्ये संशोधनाला प्राधान्य देणारी विद्यापीठे तयार झाली पाहीजेत.   त्यासाठी शिक्षकांची गुणवत्ता, गुणवत्तापुर्ण शिक्षण व उपयुक्त संशोधन यावर भर देणे गरजेचे आहे. भारतातील उच्च शिक्षणाबाबतच्या विविध आव्हानांबाबत यावेळी श्री. माशेलकर यांनी सविस्तर चर्चा केली.

0 0 0  0

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०१५

केबल चालकांनी करमणुक शुल्काचा तात्कांळ भरणा करावा

धुळे दि.27 जिल्हयातील सर्व बहुविध यंत्रणा परिचालक (मल्टीसिस्टीम ऑपरेटर) व केबल परिचालक तसेच स्थानिक केबल परिचालक यांना कळविण्यात येते की त्यांनी शासन निर्णय दि.3 मार्च,2014 अन्वये बहुविध यंत्रणा परिचालक (एम.एस.ओ) यांनी सॅटेलाईटद्वारे त्यांचे मार्फत केबल ऑपरेटरांना पुरविण्यात आलेल्या केबल सेवेबाबत शासकीय करमणुक शुल्क प्रती जोडणी महानगरपालिका क्षेत्रासाठी रु.45/-, नगरपरिषद क्षेत्रासाठी रु.30/- व ग्रामीण क्षेत्रासाठी रु.15/- असे प्रती ग्राहक यांचेकडून वसुल करुन शासकीय खजिन्यात भरण्याची जबाबदारी बहुविध यंत्रणा परिचालक (एम.एस.ओ) व केबल परिचालक यांचेवर सोपविण्यात आलेली आहे.त्याचप्रमाणे सर्व बहुविध यंत्रणा परिचालक (ए.एस.ओ)  केबल ऑपरेटर यांच्याकडे असलेल्या जोडण्यांच्या संख्येबाबत जिल्हाधिकारी,धुळे यांच्याकडे घोषणापत्र करुन देणे बंधनकारक आहे.
जिल्हातील सर्व जोडण्याचे रॅण्डम पध्दतीने सर्वेक्षण करण्यात येणार असून केबल चालकांनी प्रतिज्ञापत्रात घोषित केलेल्या जोडण्या व्यतिरिक्त्‍ अधिक जोडण्या तपासणीत आढळून आल्यास महाराष्ट्र करमणुक शुल्क (सुधारणा व पुढे चालू ठेवणे ) अधिनियम,2014 नुसार प्रत्येक अपराधाबद्दल कमीत कमी रु.50,000/- किंवा झालेल्या महसूल हानीच्या 10 पट यापैकी जी रक्कम जास्त होईल ती रक्कम वसुल करण्यात येईल.
तसेच सर्व केबल जोडणी धारकांनी त्यांनी घेतलेल्या सेवेपोटी  केबल ऑपरेटर यांना देय असलेली रक्कम दरमहा अदा करावी.केबल जोडणी सर्वेक्षण तसेच करमणुक शुल्क भरणाबाबत अडथळा निर्माण करणा-या विरुध्द चौकशीअंती आवश्यक वाटल्यास फौजदारी स्वरुपाची देखील कारवाई करण्यात येईल.
तरी सर्व केबल जोडणी धारकांनी त्यांचेकडील थकीत असलेली करमणुक शुल्काची रक्कम केबल ऑपरेटर यांचेकडेस जमा करावी व अनाधिकृत केबल जोडणीचा वापर करु नये असे आवाहन जिल्हाधिकारी,अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.
                                                            00000
           


नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळाच्या धुळे व मंडळांतर्गत विभाग व उपविभागाच्या नावात बदल

धुळे, दि. 27 :- जलसंपदा विभागाच्या शासन निर्णय  17 जून, 2015 नुसार नाशिक पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे व मंडळातर्गत विभाग व उपविभागाच्या नावात झालेले बदल 1 जुलै, 2015 पासून अंमलात आणण्यात आले असल्याची माहिती धुळे मध्यम प्रकल्प विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी एका परिपत्रकान्वये दिली.
क्र.
कार्यालयाचे मूळ नाव
नावात केलेला बदल
1
कार्यकारी अभियंता,
धुळे मध्यम प्रकल्प विभाग क्र.1, धुळे
कार्यकारी अभियंता,
धुळे मध्यम प्रकल्प विभाग, धुळे
2
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
मध्यम प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
अक्कलपाडा प्रकल्प उपविभाग, अक्कलपाडा
3
उपविभागीय अभियंता,
पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण उपविभाग क्र. 1, धुळे
उपविभागीय अभियंता,
निन्मपांझरा कालवा उपविभाग, धुळे
4
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
नाग्या साक्या कालवा उपविभाग,
शेवाडी ता. शिंदखेडा जि. धुळे
सहाय्यक अभियंता श्रेणी-1,
वाडी शेवाडी प्रकल्प उपविभाग,
शेवाडी ता. शिंदखेडा जि. धुळे
5
उपविभागीय अभियंता,
सोनवद कालवा उपविभाग,
सुलवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे
उपविभागीय अभियंता,
सुलवाडे बॅरेज उपसा सिंचन उपविभाग,
सुलवाडे ता. शिंदखेडा जि. धुळे
6
उपविभागीय अधिकारी,
सोनवद धरण उपविभाग क्र. 2,
दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे
उपविभागीय अधिकारी,
सारंगखेडा प्रकल्प उपविभाग,
दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे

            वरीलप्रमाणे विभाग व उपविभागाच्या नावात बदल झाल्याने पुढील सर्व पत्रव्यवहार नवीन नावाने करण्यात यावा, असेही परिपत्रकात नमूद केले आहे.

00000

3 सप्टेंबर रोजी विमाछत्र योजनेची कार्यशाळा

धुळे, दि. 27 :- जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुखांना, आहरण व संवितरण अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी यांना  3 सप्टेंबर, 2015 रोजी डॉ. गौतम ताम्हणे (TPA (Nashik) MD India हे विमाछत्र योजनेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे.  सदर विमाछत्र योजना ही सेवानिवृत्तीच्या अखेरच्या वर्षातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सक्तीची असून त्यासंबंधीची कार्यशाळा ही जिल्हा परिषद, धुळे यांच्या सभागृहात दुपारी 3-00 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.  सर्व आहरण व संवितरण अधिकारी व त्यांच्या प्रतिनिधींनी आवश्य उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी बी. डी. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

0000000 

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०१५

महाराजस्व अभियानातून वंचितांचे ‘समाधान’ करण्याची संवेदनशिलता दाखवावी - जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 25 :- महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतीमान व पारदर्शक करण्याच्या दृष्टीने राज्यात गेल्या चार वर्षात सुवर्ण जयंती राजस्व अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.  सदर अभियानात काही नवीन लोकाभिमुख व प्रशासकीय घटकांचा समावेश करून महाराजस्व हे महत्वाकांक्षी अभियान 1 ऑगस्ट पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.  या महाराजस्व अभियानाच्या विस्तारीत समाधान योजनेतून जिल्ह्यातील शेवटच्या वंचित घटकांचे समाधान करण्याची संवेदनशिलता सर्व प्रशासकीय यंत्रणांनी दाखविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी आज केले.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडा सभागृहात  महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजना राबविण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.  या बैठकीत जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपसंरक्षक एस. जी. हलमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे,  समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्रीमती वैशाली हिंगे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी एस. एस. ईखारे,  जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. पी. वाघ, मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे उप कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे,  उप विभागीय अधिकारी राहूल पाटील (शिरपूर) जे. आर. वळवी (धुळे), तहसिलदार दत्ता शेजूळ (धुळे) नितीन पाटील (शिरपूर), माणिक आहेर  (साक्री), पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, विस्तारीत समाधान योजनेअंतर्गत विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांनी विशिष्ट दिवशी ग्राम, मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करणे संकल्पित आहे.  या विस्तारित समाधान योजनेंतर्गत शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राम, मंडळ स्तरावर महिन्यातून एका विशिष्ट पूर्व नियोजित दिवशी एकत्र यावे व जनतेस शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्यक्ष देण्याची कार्यवाही करावी.  त्यासाठी या विस्तारीत समाधान योजनेचे अत्यंत सूक्ष्म नियोजन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी करून त्यामध्ये सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय  विभागांना योग्य प्रकारे सामावून घ्यावे व त्यास व्यापक पूर्वप्रसिध्दी द्यावी.  प्रत्यक्षात कार्यक्रमांचे आयोजन लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्य जनतेस शैक्षणिक व अन्य कामाकरिता विविध स्वरूपाच्या दाखल्यांची आवश्यकता असते.  यासंबंधी प्रक्रिया सुकर करण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रमाणपत्रांकरिता सहामाही, वार्षिक परिक्षेच्या पूर्वी व सुटीच्या दिवशी तसेच सर्वसाधारण जनतेस आवश्यक दाखल्यांसाठी जनतेच्या सोयीच्या मध्यवर्ती अशा मंडळ स्तरावर  शिबिरे आयोजित करून त्याठिकाणी दाखल्यांकरिता आवश्यक ते अर्ज व कागदपत्रे याबाबत जनतेस माहिती व त्याच ठिकाणी अर्ज भरून घेऊन विविध दाखले निर्गमित करण्यात यावेत, असे सांगून   जिल्हाधिकारी म्हणाले, यासाठी  प्रथम तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांची तसेच अन्य वाटप केंद्रांची संख्या निर्धारित करण्यात यावी, त्यानंतर तेथे घ्याव्याच्या दाखले वाटप शिबीरांच्या तारखा निश्चित करण्यात याव्यात व त्यास व्यापक प्रमाणात प्रसिध्दी द्यावी, शिबिरासाठी निश्चित केलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांना विविध प्रमाणपत्रांकरिता आवश्यक असलेले अर्जाचे छापीन नमुने व आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांची यादी पुरविण्यात यावी.  जेणेकरून शिबीराच्या दिवशी परिपूर्ण विहीत नमुन्यात भरलेले अर्ज विद्यार्थ्यांकडून प्राप्त करून घेता येतील, शिबीराच्या दिवशी आवश्यक असलेला सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग शिबीरास उपस्थित राहील हे सुनिश्चित करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थ्यास, अर्जदारास त्याच दिवशी  प्रमाणपत्रे, दाखले पुरविता येतील अशी कार्यपध्दती अवलंबवावी, असेही यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.
  यावेळी बोलतांना निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे म्हणाले, महाराजस्व अभियानांतर्गत विस्तारीत समाधान योजनेद्वारे शासनाचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्राम व मंडळ स्तरावर एकत्र येऊन जनतेस शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तालुकानिहाय जिल्ह्यात एकूण 39 शिबिरांचे ऑगस्ट 2015 ते  जून 2016 पर्यंत  नियोजन करण्यात आले आहे.  त्यात धुळे तालुक्यात-12, साक्री तालुक्यात-10, शिरपूर तालुक्यात-7, शिंदखेडा तालुक्यात 10 गावांचा समावेश करण्यात आला आहे.  तालुकानिहाय व गांवनिहाय  तारखा पुढीलप्रमाणे आहेत. 
धुळे तालुका- लामकानी येथे 19 ऑगस्ट रोजी शिबिर झाले असून आर्वी (16 सप्टेंबर,2015), बोरकुंड (21 ऑक्टोंबर,2015),शिरूड (18नोव्हेंबर,2015), मुकटी (16 डिसेंबर,2015), फागणे (20 जानेवारी, 2016), नगांव (16 फेब्रुवारी, 2016), सोनगीर (17 मार्च, 2016), नेर (21 एप्रिल, 2016), कुसुंबा (19 मे, 2016), धुळे शहर (21 जुलै, 2016).
साक्री  तालुका- पिंपळपाडा येथे 15 ऑगस्ट 2015 रोजी शिबिर संपन्न झाले असून मालगांव (8 सप्टेंबर, 2015), ब्राम्हणवेल (20 ऑक्टोबर, 2015), शेणपूर (17 नोव्हेंबर, 2015), मैंदाणे (8 डिसेंबर, 2015), साक्री (12 जानेवारी, 2016), निजामपूर (9 फेब्रुवारी, 2016), दुसाणे ( 8 मार्च, 2016), कुडाशी (12 एप्रिल, 2016), म्हसदी प्र. नेर (10 ऑक्टोबर, 2016).
शिरपूर तालुका- शिरपूर (12 सप्टेंबर,2015), सांगवी (10 ऑक्टोबर, 2015), बोराडी (14 नोव्हेंबर,2015), अर्थे (12 डिसेंबर, 2015), जवखेडा (9 जानेवारी, 2016), होळनांथे (13 फेब्रुवारी, 2016), थाळनेर (12 मार्च, 2016)
शिंदखेडा तालुका- शिंदखेडा (26 ऑगस्ट, 2015), चिमठाणे (23 सप्टेंबर, 2015),शेवाडे (28 ऑक्टोबर, 2015 व 22 जून, 2016), वर्षी (25 नोव्हेंबर, 2015), खलाणे (23 डिसेंबर, 2015), नरडाणा (27 जानेवारी, 2016), बेटावद (24 फेब्रुवारी, 2016 व 27 जुलै, 2016), विरदेल (23 मार्च, 2016), विखरण (27 एप्रिल, 2016), दोंडाईचा (25 मे, 2016)


संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज गांवनिहाय आराखडा तयार करून पिण्याचे पाण्याचे करणार नियोजन -जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ

धुळे, दि. 25 :- जिल्ह्यात आजपावेतो सरासरी 55 टक्के पाऊस झाला असून गेले 15 दिवस पाऊस पडलेला नाही.  अशा परिस्थितीत संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रत्येक तालुका स्तरावरून गांवनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली आहे.
            आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सातपुडासभागृहात पिण्याच्या पाण्याकरिता धरणातील पाणीसाठा राखून ठेवण्याबाबत आयोजित करण्यात आलेल्या संबंधित यंत्रणांच्या बैठकीत बोलतांना जिल्हाधिकारी श्री.मिसाळ बोलत होते.  यावेळी  जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपसंरक्षक एस. जी. हलमारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ.बी. एन. पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत) बी. ए. बोटे, धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. वाघ, जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सी. पी. वाघ,मध्यम प्रकल्प विभाग क्र. 1 चे उप कार्यकारी अभियंता एस. के. भदाणे, उप विभागीय अधिकारी राहूल पाटील (शिरपूर) जे. आर. वळवी (धुळे), तहसिलदार दत्ता शेजूळ (धुळे) नितीन पाटील (शिरपूर), माणिक आहेर  (साक्री), पंचायत समित्यांचे गट विकास अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, टंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च महत्व असून त्यादृष्टीने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांच्या पाणी पुरवठा विभागाने गांवनिहाय व प्रभागनिहाय टंचाईचा सूक्ष्म आराखडा तयार करावा.  जिल्ह्यातील पर्जन्यमानाची परिस्थिती  अशीच राहिल्यास ऑक्टोबर-15 नंतर टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील मोठया व लघु जलस्त्रोतांचे पाणी आरक्षित करणे गरजेचे आहे.  त्यादृष्टीकोनातून जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका यांनी आपल्या कार्यक्षेत्रात लागणाऱ्या संभाव्य जलसाठ्यांचे पाणी आरक्षित करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनास तात्काळ सादर करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. अण्णासाहेब मिसाळ यांनी यावेळी दिल्या.
              जुलै-2016 पर्यंत पुरेल एवढ्या जलसाठ्याची आवश्यकता असून ही आवश्यकता लक्षात घेऊन जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठया धरणांच्या पात्रात असलेल्या जीवंत पाण्याच्या साठयाचे नियोजन करणे आवश्यक आहे.  सदरचे नियोजन करत असतांना स्थानिक लोकप्रतिनिधींच्या व शेतकऱ्यांच्या  समन्वयानेच हे नियोजन करावे.  जिल्ह्यातील 10 धरणांमधील आजच्या उपयुक्त साठ्याची टक्केवारी एकूण 27.90 टक्के इतकी असून त्यातील पांझरा-57.31 टक्के, मालनगांव-75.38 टक्के, जामखेडी-100 टक्के, बुराई-13.8 टक्के, करवंद-87.68 टक्के, अनेर-41.93 टक्के, वाडी शेवाडी-0.14 टक्के इतकी असून कनोली, सोनवद व अक्कलपाडा येथील पाणीसाठ्याची टक्केवारी निरंक असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.
            महानगरपालिकेने संभाव्य टंचाईचा आराखडा तयार करतांना ऑक्टोबर-2015 अखेर महानगरपालिकेच्या क्षेत्रात समाविष्ट होणाऱ्या संभाव्य ग्रामपंचायतींचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करणे गरजेचे आहे.  सद्य:स्थितीत जिल्ह्यात वारूड ता. शिंदखेडा व धामणदर-पारगांव ता. साक्री या  दोन ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून 37 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे.  कुंडाणे, वेल्हाणे  व वलवाडी या गावांनीही टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांपैकी धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी उद्भवचा प्रवाह सुरू असून नकाणे तलावात 90 द.ल. घ.फू. म्हणजे 25 टक्के, डेडरगाव तलाव-51 द.ल.घ.फू. (42 टक्के), शिरपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या करवंद धरणात-16.01 द.ल.घ.फू. (87.68 टक्के) तसेच दोंडाईचा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी-सारंगखेडा बॅरेजच्या पाण्याची पातळी 112.80 मीटर इतकी असून 1,601.18 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग आहे.  तर शिंदखेडा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी-सुलवाडे बॅरेजच्या पाण्याची पातळी 123.70 मीटर इतकी असून 1,440.50 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग असल्याची माहिती यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी दिली.
            जिल्ह्यातील सर्व धरणांचे पाणी मिळून सध्या जिल्ह्यात 4 हजार 834 द. ल. घ.फू. साठा असून 3 कोटी 28 लाख द.ल.घ.फू. पाणी साठयाची क्षमता सर्व धरणांची आहे.  जिल्ह्यातील पशुधनासह 22 लाख लोकसंख्येला दर दिवशी 140 लिटर याप्रमाणे 257 दिवस पुरेल एवढा पाणी साठा सध्या जिल्ह्यात शिल्लक असल्याची माहिती धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. वाघ यांनी यावेळी दिली.
 दृष्टीक्षेपात संभाव्य टंचाई...
·        जिल्ह्यात आजपावेतो सरासरी 55 टक्के इतका पाऊस.
·        असेच पर्जन्यमान राहिल्यास ऑक्टोबर-2015 अखेर  जाणवणार टंचाई.
·        जुलै-2016 पर्यंत पुरेल  इतक्या  पिण्याच्या पाण्याचे करणार नियोजन.
·        जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण 27.90 टक्के पाणी.
·        कनोली, सोनवद व अक्कलपाडा येथील पाणी साठा निरंक.
·        जिल्ह्यात दोन ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा, 37 विहिरींचे अधिग्रहण.
·        कुंडाणे, वेल्हाणे व वलवाडी (ता.धुळे)  गावांनी टँकरद्वारे पाणी पुरवण्याची केली मागणी.

000000

गोंदीया जिल्ह्यातील प्रलंबित विकास कामे गतीमान करा - मुख्यमंत्री


 दि.25गोंदीया जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकास कामांना गती देण्यात यावी,असे निर्देश मुख्यमंत्री   देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
मुख्यमंत्री श्रीफडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज गोंदीया जिल्ह्यातीलविकास कामांबाबत बैठक झालीत्यावेळी ते बोलत होतेयावेळी आमदार गोपालदास अग्रवाल,नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकरपाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचेप्रधान सचिव राजेश कुमारमुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकरगोंदीयाचे जिल्हाधिकारी विजयसुर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  
डांगुर्ली बंधाऱ्याचे काम गतिमान करण्यासाठी आंतरराज्यीय सिंचन मंडळासोबतलवकरच बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जाईलनवेगांव डेवरी उपसा सिंचन योजनेचे काम मार्गीलावण्यासाठी आपण राज्यपालांशी चर्चा करुन हा प्रश्न मार्गी लावूअसे मुख्यमंत्री म्हणाले.जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांचे पुनर्वसन करताना ग्रामस्थांना विविध योजना एकत्र करुन घरे देतायेतील का याचा विचार करावाअसेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
गोंदीया शहरात जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालय तसेच वैद्यकीय महाविद्यालय सुरुकरण्याबाबतही याप्रसंगी चर्चा झालीवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठीआराखडाअंदाजपत्रक तयार करणेप्रशासकीय मान्यता घेणे आदी कामे तातडीने पूर्ण करुन याकामाला गती देण्यात यावीतसेच जनरल नर्सिंग कोर्स महाविद्यालयासाठी आवश्यकपदनिर्मितीसही मंजुरी देण्यात यावीअसे निर्देश त्यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनादिले.
गोंदीया शहरात समाजभवन उभारणेमध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणेयासाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करुन द्यावीअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळीदिलेयाशिवाय गोंदीया शहरातील बाह्य वळण रस्त्याच्या बांधकामांसही आवश्यक निधीचीउपलब्धता करुन देऊन हा वळण मार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावाअसे ते म्हणाले.
०००