मुंबई दि. 31:‘डिजीटल इंडिया’च्या धर्तीवर ‘डिजिटल
महाराष्ट्र’ हा उपक्रम राज्याला प्रगतीपथावर
नेणारा आहे. तंत्रज्ञानाच्या या वेगवान युगात संवेदनशीलता कायम
ठेवून परस्पर सहकार्याने वाटचाल
केल्यास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र नक्कीच
आदर्श निर्माण करेल, असा विश्वास शिक्षण
मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आज व्यक्त केला.
‘एबीपी माझा’च्या ‘माझा महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते
झाला. त्यावेळी श्री. तावडे म्हणाले की,डिजिटल युगात अनेक कामे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्णत्वास जात आहेत. मात्र, तंत्रज्ञानाच्या या युगात संवेदनशीलता
हरवणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.
‘डिजिटल महाराष्ट्र’मुळे पारदर्शकता
आणि गतिमानता येऊन नागरिकांसाठी परवानगी, प्रमाणपत्रे मिळवणे आदी
प्रक्रिया सुलभ होत आहेत, असे सांगून श्री. तावडे म्हणाले की, नागरिकाला जमिनीचा
व्यवहार किंवा सरकारच्या योजनेसाठी अर्ज करावयाचा झाल्यास त्याच्याकडून सात बाराचा उतारा मागविला जातो, पण प्रत्यक्ष हा सात बाराचा उतारा
सरकारदफ्तरी नोंद होत असल्याने उपलब्ध असतो. त्यामुळे हा सात बारा शासकीय
कार्यालयांकडूनच कसा प्राप्त होईल, याबाबत विचार सुरु आहे. सात बारा जलद गतीने उपलब्ध झाल्यास गैरव्यवहाराला आळा
बसेल व कारभार गतिमान होईल, असा
विश्वासही श्री.तावडे यांनी व्यक्त केला.
राज्य सरकारने संमत केलेल्या ‘राईट टू सर्विस अॅक्ट’मध्ये 120 सेवा नमूद केल्या असून, या सेवांचा लाभ नागरिकांना निश्चित
मुदतीत मिळणार आहे. या सेवा ऑनलाईन उपलब्ध
असाव्यात, असाही प्रयत्न आहे.‘डिजिटल महाराष्ट्र’मुळे रोजगार
वाढण्यासही मदत होणार आहे, असेही श्री. तावडे यांनी
सांगितले.
यावेळी ‘एबीपी
माझा’तर्फे आयोजित केलेल्या ब्लॉग
स्पर्धेतील विजेत्यांना श्री. तावडे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
याप्रसंगी वाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, अशोक व्यंकटरमण आदी उपस्थित होते.
००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा