मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

प्रशासनाने आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीने समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री

मुंबई दि 31 : राज्यातील गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन आणि सार्वजनिक गणेशोत्सव समितीने समन्वयाने काम करावे, अशी सूचना मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथेकेली. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त प्रशासनाने केलेल्या तयारीबाबत श्री. फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त कायदा व सुव्यवस्थेबाबतची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के. पी. बक्षी, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव गौतम चॅटर्जी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, नगरविकासविभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, मुंबईच्या जिल्हाधिकारी शैला ए, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी शेखर चन्ने, माहिती महासंचालक चंद्रशेखर ओक, पोलीस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर, कार्याध्यक्ष कुंदन आगसकर यांच्यासह समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी योग्य नियोजनामुळे सुव्यवस्था राखण्यात प्रशासनाला यश आले. त्याचप्रमाणे, गणेशोत्सवानिमित्तही सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील कायदा व सुव्यवस्था चोख करण्यात आली आहे. हा उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासन आणि गणेशोत्सव समितीने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. गणेशोत्सव मंडळांनीगणेशोत्सवासाठी उत्तम नियोजन केले आहे. प्रशासनाबरोबर मित्रत्व, सहकार्य आणि समन्वयाने हा उत्सव उत्तम प्रकारे साजरा करण्याची खबरदारी आपण घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. उत्सवाच्या काळात सर्व नागरिकांनी शांतता राखावी आणि गणेशोत्सव उत्साहात साजर करावा, असे आवाहन त्यांनी केले. गणेशोत्सव काळात मुंबईच्या गिरगाव चौपाटीचर 18 सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबईत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला ज्या परवानग्या देण्यात आल्या आहेत, त्याच धर्तीवरच इतर महानगरपालिकांनी नियोजन करावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुंबई शहराला असलेले उत्सवाचे महत्व लक्षात घेता केंद्रीय पर्यावरण विभागाच्या मंत्री महोदयांसोबत पर्यावरणाबाबत विशेष बैठक लवकरच घेण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा, गणेशोत्सव आणि आगामी काळात येणारे उत्सव लक्षात घेऊन पोलीसांवर ताण पडू नये यासाठीही काळजी घेण्यात यावी. आगामी काळात गणपती मंडळांना देण्यात येणाऱ्या परवानग्या जुन्या वर्षीच्या परवान्यावर देण्यात याव्या असेही त्यांनी स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार रात्री दहा नंतर ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपण व ध्वनीवर्धकाचा वापर करण्यावरील बंदीचे पालन सर्वांनी काटेकोरपणे करावे.  तथापि, केंद्र शासनाने केलेल्या यासंदर्भातील सुधारणेनुसार सांस्कृतिक कार्यक्रम व धार्मिक सणांकरिता 15 दिवसांची सूट देण्यात आली आहे. या 15 दिवशी रात्री दहा ऐवजी रात्री 12 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक सणाकरिता ध्वनीक्षेपकाचा वापर करता येऊ शकतो. हे पंधरा दिवस कोणते हे ठरविण्याची जबाबदारी राज्य शासनाला देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी या संदर्भात बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या विनंतीवरुन गणेशोत्सवासाठी 4 दिवस निश्चित करण्यात आले होते. यावर्षीही याच धर्तीवर ही सुट देण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या. गणपती विर्सजनामुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठीही योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सुचित केले आहे.

गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या परवानग्या, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्वयंसेवक नेमावेत व जागोजागी सूचना फलक लावावेत त्याचप्रमाणे, मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने समन्वयक या नात्याने गणेशोत्सवापूर्वी कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यांनी यावेळी दिले. ते म्हणाले, वीज विभागाने भारनियमन वाढणार नाही याची काळजी घ्यावी.  आरोग्य विभागाने साथीच्या रोगांचा फैलाव होऊ नये यासाठी जनजागृती करण्याबरोबर पुरेसा औषधांचा साठा ठेवावा. विविध विभागांनी गणेशोत्सव काळात केलेल्या उपाययोजनांबाबत जाहिरातीद्वारे माहिती द्यावी, असे निर्देशही संबंधित विभागांना मुख्यमंत्री यांनी यावेळी दिले.


                                                ००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा