मंगळवार, १ सप्टेंबर, २०१५

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन ‘बिग ग्रीन गणेशा’ उपक्रमाचे उद्घाटन

मुंबई दि.1: गणशोत्सवामधील पावित्र्य आणि पर्यावरण संवर्धन यासाठी गणेशोत्सव पर्यावरण पूरक पध्दतीने साजरा होणे ही काळाची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी आग्रही राहिले पाहिजे.प्रत्येकान आपला दृष्टिकोन पर्यावरणस्नेही ठेवला तरच उत्सव साजरे करण्याबाबत सामाजिक परिवर्तन होऊ शकेल,असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

            पर्यावरण विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि 92.7 बिग एफएम यांच्यवतीने आयोजित बिग ग्रीन गणेशाजनजागृती उपक्रमाचे उद्घाटन आज मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला पर्यावरण मंत्री रामदास कदम, पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, विधानपरिषदेचे सदस्य पांडुरंग फुंडकर, पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन, बिग एफ.एम आणि बिग मॅजिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण कटियाल, बिग एफ.एमचे स्टेशन डायरेक्टर जय मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे अभिनंदन केले आणि हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले. या उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले आहे. तो धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, कोणतेही सामाजिक बदल पटकन आत्मसात करण्याची विद्यार्थ्यांची वृत्ती असते. कोणतेही परिवर्तन विदयार्थीच घडवू शकतात असे मी मानतो. आज या अभियानात शालेय विदयार्थ्यांना सामावून घेण्यात आल्याने आगामी काळात हे विदयार्थी या पर्यावरण स्नेही उपक्रमात सर्वांचा सहभाग मिळवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            पर्यावरण विभागाने पर्यावरणपूरक होळीनंतर पर्यावरणपूरक गणेशोत्सव राबविण्यासाठी उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह असल्याचेही मख्यमंत्र्यांनी सांगितले. ज्या गोष्टी पंचतत्वात विलीन होतात, त्याच गोष्टी ईश्वराशी साधर्म्य साधू शकतात. व्यक्ती मृत झाल्यावर त्या व्यक्तीलाही पंचतत्वात विलीन करतो आणि मग त्यातूनच पुननिर्मिती होते, असे आपण मानतो. तसेच उत्सवांची रचना सुध्दा पंचतत्वाच्या आधारेच केली आहे. गणपती विर्जित केल्यावर गणपतीच्या मूर्तीची आणि निर्माल्य यांची होणारी दशा आपण पाहतो. यामुळेच आपला दृष्टीकोन बदलून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. रद्दीच्या आणि कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात येणारी इको फ्रेंडली गणेशमूर्ती हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून आगामी काळात प्रत्येक मूर्ती ही पर्यावरणपूरक असेल, अशी इच्छाही श्री. फडणवीस यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.
 आपला प्रत्येक सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा रामदास कदम

            पर्यावरण मंत्री श्री. कदम यावेळी म्हणाले की, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पर्यावरण विभाग प्रयत्न करीत आहे. यापुढेही असेच विविध उपक्रम राबवून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी पर्यावरण विभाग कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. आपले सगळे सण यापुढे पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे व्हावे यासाठी आपला विभाग प्रयत्न करीत आहे. पर्यावरणाचे रक्षण ही पर्यावरण विभागाची जबाबदारी आहे, असे मी मानतो. गणपतीच्या मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास गणपतीचे विर्सजन केल्यानंतर या मूर्ती तत्काळ विर्जित होतात आणि म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाडयाच्या दौऱ्यावर जात आहे. दौऱ्यावर जाण्यापूर्वी आज गणेशाचे आशीर्वाद घेऊन जात आहेत. मराठवाडयात पाऊस पडेल आणि गणपती बाप्पा येथील दुष्काळ दूर करेल, अशी मला आशा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

            पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव मालिनी शंकर यावेळी आपल्या भाषणात म्हणाल्या की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत राबविण्यात येणारा हा उपक्रम चांगला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या इको फ्रेंडली गणेशोत्सव उपक्रमार्फत समाजाचे प्रबोधन केले जात असून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केले जात आहे. या चळवळीत आता विद्यार्थ्यांनाही सामील करुन घेतल्याने या उपक्रमाला आणखी गती येणार आहे.

            महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. पी. अनबलगन यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकेत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि 92.7 बिग एफ.एम. यांच्या मार्फत गणेशोत्सवाच्या काळात पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या गणपतीच्या मर्ती विविध मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.


            या कार्यक्रमात इको बाप्पा या मोबाईल ॲपचे उद्घाटनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा