गुरुवार, २४ सप्टेंबर, २०१५

बकरी ईद निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

मुंबई, दि.२४:राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला बकरी ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
बकरी ईद (ईद उल झुहा) मानवी जीवनातील त्याग व समर्पण या उदात्त मूल्यांचे स्मरण देते. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान व समृद्धी आणो, अशी मी कामना करतो, तसेच राज्यातील जनतेला ईदेच्या हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

०००

सुगम्य भारत अभियानाची महाराष्ट्रातून सुरूवात अपंगांच्या सक्षमीकरणाचे अभियान ‘मिशन’ म्हणून राबविणार - मुख्यमंत्री


मुंबई, दि. 24 : अपंगांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाने सुरू केलेले सुगम्य भारत अभियान (ॲक्सेसिबल इंडिया कँपेन) हे एक महत्त्वाचे पाऊल असून हे अभियान राज्य शासन एक मिशन म्हणून राबविणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे जाहीर केले. या अभियानांतर्गत राज्यातील चार शहरांची निवड करण्यात आली असून त्यातील सार्वजनिक कार्यालयांच्या इमारती अपंगांच्या वापरासाठी सुलभ करण्यात येणार आहेत.
केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अपंग सक्षमीकरण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सुगम्य भारत अभियानाच्या (ॲक्सेसिबल इंडिया कँपेन) प्रारंभानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. तिचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, परिवहन मंत्री दिवाकर रावते, अभिनेता विवेक ओबेरॉय, केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे सचिव लव वर्मा, संयुक्त सचिव मुकेश जैन, अवनीशकुमार अवस्थी, राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव उज्ज्वल ऊके आदी यावेळी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले,केंद्र शासनाच्या या अभियानाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. देशात विसाव्या शतकात अपंगांच्या विकासासाठी अनेक कायदे करण्यात आले.त्यांचे नियोजनही करण्यात आले. परंतु नुसते नियोजन करून योजना यशस्वी होत नाही तर त्याची अंमलबजावणी व्हायला हवी, तरच अंपगांचे योग्य प्रकारे सक्षमीकरण होईल. अपंगांच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यानुरुप कोणतीही व्यवस्था निर्माण झाली नाही. आता देशात या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्री. गेहलोत, श्री. गुर्जर यांनी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर योजनांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या अभियानाच्या माध्यमातून देशातील अपंगांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे.
            सार्वजनिक इमारतींमध्ये अपंगांसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करणे, अपंगांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुसह्य करणे आणि विविध संकेतस्थळे सर्व प्रकारच्या अंपगांसाठी वापरण्यायोग्य करणे या तीन महत्त्वाच्या बाबींचा समावेश या अभियानात केला गेला आहे, असे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आज माहिती तंत्रज्ञान युगात माहिती संवाद तंत्रज्ञानाचा वापर सर्वच वर्गाकडून केला जात आहे. परंतु समाजातील एक मोठा वर्ग आजही त्यापासून वंचित राहत असेल तर सर्वांगीण विकासाचे सबका साथ सबका विकासहे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे जर माहिती संवाद तंत्रज्ञानाचा वापर केला तर कोणत्याही प्रकारच्या अपंगात्वावर मात करता येईल.
सुगम्य भारत अभियानामध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश केला गेला आहे. तेथे ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्र शासन प्राधान्याने एक टीम म्हणून काम करेल. त्यासाठी आम्ही या अभियानाकडे एक मिशन म्हणून पाहणार आहोत. अपंग विशेषतः अंध बांधवांसाठी आयआयटी दिल्लीने तयार केलेले ऑनबोर्ड हे अॅप्लिकेशन एक महत्त्वाचे पाऊल असून त्या माध्यमातून अंध बांधवांना वाहतूक व्यवस्थेमध्ये चांगली सुविधा निर्माण करता येईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राज्यातील 4 शहरांचा समावेश

श्री. गेहलोत म्हणाले, देशातील अपंगांना मदत करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यांचा सर्वांगीण विकास व सक्षम करण्याचे कर्तव्य केंद्र शासनाचे सामाजिक न्याय मंत्रालय करत आहे. त्यासाठी केंद्र शासन अपंगांच्या सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या योजना राबवित आहे. त्याचाच एक भाग म्हणून कृत्रिम अंग निर्मिती महामंडळाचे विस्तारीकरण व आधुनिकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 286 कोटी रुपये केंद्राने दिले आहेत. तसेच कृत्रिम अवयव निर्मितीसाठी जर्मनीच्या कंपनीबरोबर करार करण्यात आला आहे. तसेच कानपूर येथील केंद्रात आधुनिक कृत्रिम हात, पाय आणि इतर अवयव निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. मुंबईतही अशी यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. मूकबधिरांसाठी कोरियाच्या सहकार्याने क्लॉक्लियर यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. पाच वर्षाखालील 500 मुलांना ही यंत्रे बसविण्यात येत आहेत. त्यातील 257 बालकांना ती बसविण्यात आल्याने त्यांना आता ऐकणे-बोलणे शक्य झाले आहे.
सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून देशातील 50 शहरांमधील प्रत्येकी 100 सार्वजनिक इमारतींमध्ये अपंगांसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील 4 शहरांचा समावेश आहे. या सार्वजनिक इमारतींमध्ये वावरताना अपंगांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी लिफ्ट, रॅम्प, रेलिंग बनविणे आणि अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, अशी माहितीही श्री. गेहलोत यांनी दिली.
श्री. गुर्जर म्हणाले, अपंगांच्या विकासाठी सुलभता आवश्यक आहे. त्यासाठी शासन, सार्वजनिक संस्था व सर्वसमान्यांनी पुढाकार घ्यावा. या अभियानाच्या माध्यमातून अपंगांसाठीच्या योजनांचा प्रचार- प्रसार करण्यात येणार आहे.
राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अपंगांसाठी सर्वप्रकारच्या सुविधा देण्यात येतील. त्याबरोबरच अपंगांच्या स्वयंरोजगारासाठी परिवहन विभाग पुढाकार घेईल, असे आश्वासनही श्री. रावते यांनी यावेळी दिले. यावेळी अभिनेता विवेक ओबेरॉय, केंद्रीय सचिव श्री. वर्मा, संयुक्त सचिव श्री. जैन यांनीही मनोगत व्यक्त केले.
0000

राज्याचा ऊस गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून ‘एफआरपी’नुसार दर न दिल्यास कारखान्यांवर कारवाई - मुख्यमंत्री

मुंबई, दि. 24: साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करताना शेतकऱ्यांना एफआरपीनुसार दर न दिल्यास कडक कारवाई करण्यात येईल. गेल्या वर्षी शेतकऱ्यांना एफआरपीनुसार 75 टक्क्यांपर्यंत रकमेचे वाटप केलेल्या कारखान्यांनी उर्वरित रक्कम एक महिन्याच्या आत द्यावी. तसेच यंदाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
मंत्रालयात आज ऊस गाळप आढावाव हंगाम नियोजनबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीची बैठक झाली. कृषिमंत्री एकनाथराव खडसे, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार अजित पवार, आमदार दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आदींसह साखर संघाचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता यंदाचा गाळप हंगाम हा 15 ऑक्टोबर पासून सुरू करणे योग्य राहील. मात्र या तारखेपूर्वी जे कारखाने गाळप हंगाम सुरू करतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. स्थानिक पाणी परिस्थिती लक्षात घेऊन साखर कारखान्यांना पाणी परवाने द्यावेत. 15 जुलैपर्यंत पुरू शकेल इतके पिण्याचे पाणी राखीव ठेऊन उर्वरित पाण्याचे नियोजन करण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासता कामा नये.
केंद्र शासनाने या वर्षीच्या गाळप हंगामासाठी प्रती मेट्रीक टनासाठी 2300 रुपये इतकी एफआरपी जाहीर केली आहे. हा दर साडे नऊ टक्के उताऱ्यासाठी असून राज्यातील सरासरी उतारा 11.30 टक्के आहे. त्यानुसार राज्यातील सरासरी एफआरपी प्रति टन 2736 रुपये एवढी आहे. त्यातून 550 रुपये तोडणी व वाहतूक खर्च वजा केल्यास राज्यातील शेतकऱ्यांना 2186 रुपये एफआरपी मिळणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षी एफआरपीनुसार उसाला भाव दिला आहे व ज्यांनी 75 टक्क्यांपर्यंतची देणी शेतकऱ्यांना दिली आहेत, अशा कारखान्यांनी येत्या महिनाभरात उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना अदा करावी अन्यथा  यंदाच्या गाळप हंगामास परवानगी दिली जाणार नाही. ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपेक्षा कमी देणी दिली आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नक्तमुल्य उणे असणाऱ्या साखर कारखान्यांना ते सुरू झाल्यानंतरच थकहमी दिली जाईल. याबाबत सहकार मंत्री, विभागाचे सचिव व वित्त विभागाचे सचिव यांनी बैठक घेऊन निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
इथेनॉलवरील जकात अथवा एलबीटी रद्द करण्याबाबत तसेच सॉफ्टलोन योजना सर्व प्रकारच्या साखरेवर देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. बैठकीस सहकार विभागाचे प्रधान सचिव शैलेशकुमार शर्मा, वित्त विभागाचे प्रधान सचिव सीताराम कुंटे, साखर आयुक्त श्री. शर्मा आदींसह साखर संघांचे सदस्य व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-----०००-----

मंगळवार, २२ सप्टेंबर, २०१५

रब्बीच्या क्षेत्रात यंदा भरघोस वाढ होण्याची शक्यता राज्यातील दमदार पावसामुळे टँकर, चारा छावण्यांच्या संख्येत घट

·         ‘जलयुक्त शिवार’च्या कामांमुळे पाणीटंचाईचे सावट दूर
·        स्वयंचलित हवामान केंद्र सुरु करण्याचे आदेश

            मुंबई, दि. 21 :गेल्या काही दिवसात राज्याच्यासर्व भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बहुतांशी प्रमाणात सुटण्यास मदत होणार असून टँकर आणि चारा छावण्यांची संख्याही कमी झाली आहे. त्यासोबतच जलयुक्त शिवार योजनेतील कामामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याचे चित्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या आढाव्यात समोर आले आहे. या पावसामुळे रब्बीच्या क्षेत्रात भरघोस वाढ होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिगच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसहसोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगरयेथील जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून पिक-पाण्याच्या परिस्थितीचा सविस्तरआढावा घेतला. त्यावेळी राज्यातील दुष्काळाचे सावट भेडसावणाऱ्या अनेक भागातील चित्र स्पष्ट झाले आहे. मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव के. एच. गोविंदराज, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
            समाधानकारक पावसामुळे राज्यात जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे पाणी साठ आणि सिंचन क्षमतेत झालेल्या वाढीचा आढावा घेण्याच्या सुचना देऊन मुख्यमंत्री म्हणाले, पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन झाल्यासत्‍याचा रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे. रब्बीखालील क्षेत्रात मोठी वाढ शक्य असून राज्यात जवळपास 70 लाख हेक्टरवर रब्बीची पिके घेतली जातील, असा अंदाज आहे. शासकीय यंत्रणेने त्या दृष्टीने नियोजन करावे. ज्या जिल्ह्यात रब्बीची पिके घेतली जात नाहीत अशा जिल्ह्यातही रब्बी पीक घेण्यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
            राज्यात गेल्या काही दिवसात झालेल्या समाधानकारक पावसामुळे अनेक जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर होण्यास मोठी मदत झाली आहे. बहुतांश जिल्ह्यात जूनपर्यंत पुरेल इतका जलसाठा निर्माण झाला आहे, तर अवर्षणग्रस्त भागातील स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली असून या भागातही मार्चपर्यंत पाणीटंचाई भेडसावणार नाही, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले, या पावसाच्या पहिल्या टप्प्यात पाणी आणि चाऱ्याची स्थिती चांगल्याप्रकारे सुधारली आहे. जायकवाडी प्रकल्पातील साठा सव्वाचार टक्क्यांवरून 7 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. जालना जिल्ह्यातील गलाटी धरण प्रथमच 70 टक्के इतके भरले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील टँकरची संख्या 143 वरून 64 इतकी कमी झाली आहे. तर जालना जिल्ह्यात सात मध्यम प्रकल्पातील जलसाठा 53 टक्के इतका वाढला असून लघु प्रकल्पातही जलपातळी वाढू लागली आहे.  बीड जिल्ह्याला या पावसाने मोठा दिलासा दिला असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पातील साठा साडेतीन टक्क्यांवरून साडेतेरा टक्क्यांपर्यंत तर लोअर दुधना प्रकल्पातील साठा 27 टक्क्यांवरून 55 टक्क्यांवर गेला आहे. विष्णूपुरी (जि. नांदेड) आणि माजलगाव (जि. बीड) या प्रकल्पातही पातळी वाढू लागली आहे. इतर ठिकाणीही परिस्थितीत मोठा बदल होत आहे. अनेक ठिकाणी गुरांसाठी उघडलेल्या चारा छावण्या बंद होऊ लागल्या असून पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टँकरची संख्याही कमी होत आहे. काही गावात चारा टंचाई असली तरी याच गावांच्या जिल्ह्यात इतरत्र उपलब्ध असणाऱ्या चाऱ्यामुळे बाहेरून चारा मागविण्याची वेळ येणार नाही. अजून परतीचा पाऊस बाकी असल्याने या परिस्थितीत अधिक सुधारणा होईल.
            राज्यात अनेक गावात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून चांगली कामे झाल्याने या पावसामुळे या अभियानाला मोठे यश लाभल्याचे सिद्ध झाले आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विकेंद्रीत जलसाठ्यामुळे शेतीचा शाश्वत विकास होऊ शकेल, असा विश्वास निर्माण झाला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड आदी जिल्ह्यातील जलप्रकल्पांतील पाणीपातळी वाढू लागली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील टंचाईसदृश परिस्थितीचे सावट दूर झाले आहे.
            नवीन जलस्त्रोत निर्माण करण्यापेक्षा जुन्या स्त्रोतांची दुरुस्ती व सक्षमीकरणावर लक्ष केंद्रीत केल्यास कमी खर्चात व कमी वेळेत चांगले काम होईल. तसेच स्वयंचलित हवामान केंद्र लवकर सुरु व्हावीत यासाठी कार्यवाही करावी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन मदतीचे वाटप करावे, वन हक्क कायद्याअंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमिनीच्या सातबाऱ्यावर त्या शेतकऱ्याचे नाव नोंदवावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी यावेळी दिले.

०००००००

छावण्यांमध्ये दाखल होणाऱ्या जनावरांना पशुसंवर्धन विभागामार्फत नि:शुल्क पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध

मुंबई, दि. 21 : यावर्षी महसूल व वन विभागाकडून राज्यात टंचाई घोषित केलेल्या भागांमध्ये उघडण्यात आलेल्या तसेच उघडण्यात येणाऱ्या जनावरांच्या छावण्यांमध्ये दाखल झालेल्या तसेच दाखल होणाऱ्या जनावरांना रोग प्रतिबंधक लसीकरण, पशू रुग्णांवर उपचार, जंतनाशके पाजणे, लहान व मोठ्या शस्त्रक्रिया, खच्चीकरण, कृत्रिम रेतन, गर्भ तपासणी, वंध्यत्व तपासणी इत्यादी सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
            यासंबंधीचा शासन निर्णय आज दि. 21 सप्टेंबर, 2015 रोजी जारी करण्यात आला असून तो ताबडतोब अंमलात आला आहे. वरील विविध पशुवैद्यकीय सेवा टंचाई परिस्थिती संपुष्टात आल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात येईपर्यंतच्या कालावधीसाठी विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
००००

अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मुलींचे शिक्षण महत्त्वाचे -राज्यपाल चे.विद्यासागर राव


औरंगाबाद,दि. 21 : अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम असून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी  अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे, असे  प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.चे.विद्यासागर यांनी आज येथे केले.
                अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मुलींचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. सुमारे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 175 प्रवेश क्षमतेच्या या वसतिगृहाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचेअध्यक्ष हरीभाऊ बागडे हे होते.  यावेळी व्यासपीठावर महसूल मंत्री एकनाथराव खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, कुलगुरु प्रो.बी.ए.चोपडे यांची उपस्थिती होती.
                यावेळी राज्यपाल म्हणाले की, व्यक्तीच्या जडणघडणीत आणि सुसंस्कृत समाजाच्या उभारणीमध्ये शिक्षणाची भूमिका परिणामकारक असून मुलींना विशेषतःग्रामीण भागातील तसेच दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीमध्ये या समाजातील मुलींची प्रगती हा महत्वाचा टप्पा असून त्यादृष्टीने उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देणारे हे वसतिगृह अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने या विभागाने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नती होण्यात समाजातील सुशिक्षित मुली-स्त्रियांची भूमिका महत्त्वाची ठरणारी आहे,त्यादृष्टीने बदलत्या काळानुसार कौशाल्याधारित शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा,असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
            देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर देश उभारणीसाठी अल्पसंख्याक समाजाने दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले की, तत्कालीन हैद्राबाद संस्थानातील जनतेने दिलेल्या लढ्यात सर्व थरातील लोक सहभागी झाले होते.  राज्यपालांनी शोएब उल्लाखॉन यांच्या कामगिरीचा उल्लेख करुन सांगितले की, त्यांनी कोणत्याही परिणामाची चिंता न करता त्यांची भूमिका मांडली आणि त्यांना त्यांच्या भूमिकेमुळे प्राण द्यावे लागले.  स्वातंत्र्य लढ्यात गणेश शंकर विद्यार्थी आणि शोएब उल्लाखॉन यांच्या सारख्या पत्रकारांनी  बजावलेल्या कामगिरीचे स्मरण सर्वांनी विशेषत: तरुण पिढीतील पत्रकारांनी ठेवावे.
           विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यावेळी म्हणाले की, शिक्षणाने जगण्याचे शहाणपण प्राप्त होत असते.त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे.त्यादृष्टीने ग्रामीण भागातील शाळांची  गुणवत्ता वृद्धीगंत करण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.
          महसूल मंत्री एकनाथराव खडसे यावेळी म्हणाले की, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी  विभागामार्फत भरीव प्रयत्न केले जात असून मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढण्यासाठी मुलींना 15 हजार रु. शिष्यवृत्ती, मोफत शिक्षणाची संधी,वसतिगृहाची सुविधा यासारख्या विविध उपयुक्त योजना राबविण्यात येत असून उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार,व्यवसाय करण्यासाठी विभागामार्फत पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  विद्यापीठाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले 175 विद्यार्थिनी क्षमतेचे हे वसतिगृह एक स्तुत्य उपक्रम असून त्याचे रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह असे  नामकरण करण्यात येत असल्याचे महसूल मंत्र्यांनी या वेळी जाहीर केले.
       या कार्यक्रमाला सर्वश्री आमदार सतिश चव्हाण, आ. अतुल सावे, आ. इम्तियाज जलिल, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, कुलसचिव डॉ.महेन्द्र शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख,प्राध्यापक,विद्यार्थी,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागतपर भाषण कुलगुरु प्रो.चोपडे यांनी केले. 

00000

फलोत्पादनाशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक – राज्यपाल


औरंगाबाद,दि. 21 : फळांचे उत्पादन, साठवणूक आणि वाहतुकीशी निगडीत आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे असे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे सांगितले.
            राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेत इस्त्राएलच्या सहकार्याने येथील हिमायत बागेत केशर आंबा गुणवत्ता केंद्र उभारण्यात आले आहे.  त्याचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते आज झाले.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे हे होते.  राज्याचे कृषि व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.  कृषि व फलोत्पादन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, आ. अतुल सावे, आ. सय्यद इम्तियाज जलील, इस्त्राएलचे कॉन्सिल जनरल डेव्हीड अकोव्ह, कॉन्सिलर डॅन अलूफ, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, कुलगुरु डॉ. बी. व्यंकटेश्वरलू यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            हिमायत बागेत या केंद्राचे औपचारिक उद्घाटन केल्यानंतर व तेथील सुविधांची पाहणी केल्यानंतर  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपालांना या केंद्राची तसेच केंद्राशी निगडीत बाबींची सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली.  यावेळी राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्रात फलोत्पादनाला वाव आहे आणि येथे उत्पादित फळांना मागणीही आहे. फळांची निर्यात करणे शक्य व्हावे यासाठी उत्पादन, हाताळणी आणि वाहतूक या बाबतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग होणे गरजेचे आहे.  परदेशांनी निर्धारित केलेल्या गुणवत्ता विषयक मापदंडांच्या  कसोटीवर आपले उत्पादन उतरणे आवश्यक आहे, याची माहिती शेतकऱ्यांना दिली जावी आणि त्यादृष्टीने त्यांची क्षमता विकसित केली जावी, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.  या दिशेने हे केंद्र काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
            राज्यपाल म्हणाले की, फलोत्पादन वाढवतानाच वेगवेगळ्या टप्प्यांवर फळांची काळजी घेणे आवश्यक आहे.  आपल्याकडे बहार आल्यानंतर हाताळणी आणि अन्य बाबतीत काळजी घेतली जात नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर उत्पादन वाया जाते.  यात सुधारणा होणे तसेच फळे टिकविण्याचे तंत्रज्ञान विकसित होऊन ते उत्पादकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे.
            आरोग्यपूर्ण जीवनशैलीसाठी दैनंदिन आहारात भाजीपाला आणि फळांच्या उपयोगाचे महत्व नमूद करुन राज्यपालांनी या बाबी ग्राहकापर्यंत पोहचणे आवश्यक आहे, असे सांगितले.
            राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील अपुऱ्या पावसाचा आणि खालावत चाललेल्या भूजल पातळीचा उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले की, ही परिस्थिती लक्षात घेता  जलसंधारणाच्या कामांना विशेष महत्त्व आहे. राज्य शासनाने हाती घेतलेला जलयुक्त शिवार अभियान हा या दिशेने हाती घेण्यात आलेला एक चांगला उपक्रम आहे.  जलसंधारणाची आवश्यकता लक्षात घेता येती दहा वर्षे राज्यात विविध माध्यमातून जलसंधारणाची कामे व्हावीत. त्यासाठी हे दशक जलसंधारणाचे दशक म्हणून ओळखले जावे. या कालावधीत काळाच्या कसोटीवर टिकलेल्या पारंपारिक उपायांबरोबरच अन्य  उपक्रमांच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे हाती घेतली जावीत. त्यामुळे  राज्य  आणि देश सुजलाम सुफलाम होऊ शकेल.
            यावेळी विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी शेतकऱ्याला वाढते उत्पन्न व्हावे व त्याच्या जीवनमानाचा स्तर वाढावा यासाठी फळबागांचे महत्व असल्याचे सांगितले. पाण्याच्या प्रश्नामुळे मोसंबी उत्पादक शेतकरी डाळींबाकडे वळला आहे, असे ते म्हणाले.
            कृषी व फलोत्पादन मंत्री एकनाथ खडसे यांनी केशर आंबा गुणवत्ता केंद्राच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.  ते विकसित होईल व फलोत्पादक शेतकऱ्यापर्यंत सातत्याने पोहचविले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.  इस्त्राएलचे पाणी व्यवस्थापन महत्वाचे असून ते शेतकऱ्यापर्यंत पोहचवावे असेही ते म्हणाले.
            इस्त्राएलचे कॉन्सिल जनरल डेव्हीड अकोव्ह व कॉन्सिलर डॅन अलूफ यांनी या केंद्रातील उपलब्ध तंत्रज्ञान व अन्य बाबींची माहिती दिली.  भारत- इस्त्राएल यांचे परस्पर सहकार्य वाढत असल्याचे सांगून हे केंद्र एक मॉडेल म्हणून विकसित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  पाणी व्यवस्थापन तसेच सांडपाण्याचे शुध्दीकरण करुन त्याचा वापर याबाबतही त्यांनी माहिती दिली.
            या कार्यक्रमात फलोत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी भगवान डोंगरे आणि सूर्यभान कामटे यांनी त्यांचे अनुभव नमूद केले व अपेक्षाही व्यक्त केल्या.
            या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. निधी पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत चौधरी यांच्यासह कृषी, फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

मुंबई, दि.21 :राज्यातील विविध महाविद्यालयातील अभ्यासक्रमाच्या फक्त प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क मिळण्यासाठी  ऑनलाईन अर्ज तत्काळ भरण्याचे आवाहन मुंबई उपनगरच्या समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. https://mahaeschol.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर हा ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2015 अशी आहे.
           
सामाजिक न्याय विभागामार्फत महाविद्यालयात शिकणाऱ्या अनुसूचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क देण्यात येते. त्यासाठी प्रत्येक वर्षी ऑनलाईन अर्ज करावे लागत होते. परंतु सन 2015-16 या वर्षीपासून केवळ प्रथम वर्षाच्या (इ. 11 वी, प्रथम वर्ष पदवी, पदविका, प्रमाणपत्र अभ्यासक्रम) मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच ऑनलाईन अर्ज भरणे  आवश्यक आहे. दुसऱ्या वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यकता नसून त्यांच्या अर्जाचे नुतनीकरण महाविद्यालय करणार असल्याचे सहायक आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांना लाभ घेण्यासाठी तात्काळ ऑनलाईन अर्ज भरावे, असे आवाहन सहायक आयुक्तांनी केले आहे.

000

धर्मादाय संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या हॉस्पिटलने अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि. 21 :धर्मादाय संस्थामार्फत चालविण्यात येणा-या हॉस्पिटलमधील आर्थिकदृष्टया गरीब वर्गातील लोकांसाठी असलेल्या अत्यावश्यक वैद्यकीय सुविधांची माहिती देणे बंधनकारक असून जे हॉस्पिटल अशी माहिती देणार नाहीत तसेच हॉस्पिटलमधील रिकाम्या बेडची माहिती आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर टाकणार नाही त्यांचेवर कारवाई करावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
            आज मुख्यमंत्र्यांच्या दालनात धर्मादाय आयुक्त शशिकांत सावळे यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. धर्मादाय संघटना अधिक प्रभावी व गतिमान होण्यासाठी तसेच सर्व धर्मादाय विश्वस्तांमध्ये संस्थेच्या लेखा परिक्षण, बदल अर्ज व इतर न्यायिक बाबी, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील रुग्णांच्या बाबत उपाययोजना आदिंबाबत विश्वस्त संस्थामध्ये लिगल प्रोव्हिजन अवेरनेस येण्यासाठी नाशिक येथील सपकाळ नॉलेज हब येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजित करण्याचे नियोजन आहे. या कार्यशाळेचे निमंत्रणही यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी आयुक्त सावळे यांच्यासोबत सपकाळ नॉलेज हब चे रविंद्र सपकाळ, नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ नितिन ठाकरे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष उमेश गायधनी आदि उपस्थित होते.  या कार्यशाळेस राज्यातील 3 हजार विश्वस्तांना आमंत्रित करण्यात येणार असल्याची माहितीही आयुक्तांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली.
            राज्यभरातील सर्व धर्मादाय कार्यालयात दि. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत हे अभियान राबविण्यात आले असून मुंबई येथील कार्यालयात पाच हजार पाचशे बदल अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. नवीन दाखल होणारे बदल अर्ज त्याचदिवशी निकाली काढण्यासाठी विशेष एक खिडकी योजनेची तरतूद करण्यात आली असून आयुक्तालयात प्रलंबित असलेल्या अवादातीत बदल अर्ज (चेंज रिपोर्ट) अर्जांची समस्या निवारण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या विशेष अभियानाची माहिती यावेळी दिली.
            सध्या राज्यात नोंदणीकृत साडेसात लाख धर्मादाय विश्वस्त संस्था असून त्यापैकी साडेतीन लाख विश्वस्त संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी 80 हजार संस्था मोठया स्वरुपाच्या असून या संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांवर या कार्यशाळेत विश्वस्त संस्थांना अधिक प्रभावीपणे कार्य करता यावे यासाठी  विविध क्षेत्रातील तज्ज्ञामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
---0000---


शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

सिंहस्थ महाकुंभ पर्वातील शेवटची शाही मिरवणूक थाटात संपन्न

नाशिक दिनांक 18 : बारा वर्षांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे संपन्न होत असलेल्या सिंहस्थ महाकुंभ पर्वातील नाशिक येथील तिस-या आणि शेवटच्या शाहीस्नानासाठी सकाळी ठीक 5.45 वाजतायेथील लक्ष्मीनारायण मंदिरापासून ढोलताशांच्या गजरात, गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो, जय श्रीरामाच्या जयघोषात मुसळधार पावसाच्या साक्षीने शाही मिरवणुकीने प्रारंभ झाला.
            या मिरवणुकीची सुरुवात निर्मोही आखाड्याने झाली. या आखाड्यात जवळपास 70 पेक्षा अधिक चित्ररथ सहभागी झाले होते. सर्व चित्ररथ हार, फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आले होते. यावेळी परदेशी साधकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
            शहरात सुरु असलेल्या पावसामुळे मिरवणुकीच्यावेळी भाविकांची वर्दळ कमी असली, तरी या शेवटच्या पर्वणीचे शाहीस्नान करण्यासाठी साधूसंतांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. जसजसा पावसाचा जोर कमी झाला तसतशी साधुग्राममध्ये भाविकांची गर्दी वाढू लागली. शाही मिरवणुकीच्या मार्गांवर दुतर्फा भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            सकाळी 6.30 च्या सुमारास दिगंबर आखाड्याच्या मिरवणुकीस सुरुवात झाली. या मिरवणुकीत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत श्री. ग्यानदास महाराज हे आपल्या शिष्यांसह पायी सहभागी झाले होते. या मिरवणुकीत साधू, संत व स्थानिक भाविकांनी आपल्या विविध कला सादर करुन भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
            तर या महाकुंभ पर्वातील शेवटच्या शाहीस्नानासाठी तिस-या क्रमांकावर असलेला निर्वाणी आखाडयाच्या मिरवणुकीस सव्वा सात वाजता सुरुवात झाली. या मिरवणुकीच्या अग्रभागी नाशिक शहराचे महापौर अशोक मुर्तडक सहभागी झाले होते. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने चित्ररथ सामील झाले होते.
            दुस-या पर्वणीच्यावेळी झालेली अफाट गर्दी लक्षात घेता पोलीस व प्रशासनातर्फे या पर्वणीच्यावेळी चोख बंदोबस्ताचे नियोजन केल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता मिरवणूक सुरळीत व वेळेत पार पडण्यास मदत झाली.
--- 000 000 ---


उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्या ऑनलाईन द्याव्या -मुख्यमंत्री

            मुंबई, दि. 18 : राज्यात उद्योग सुरू करण्यासाठी विविध विभागाच्या लागणाऱ्या परवानग्या ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ अंतर्गत सात दिवसांच्या आत देण्यात याव्यात. या परवानग्या देण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
         उद्योगांसाठी लागणाऱ्या विविध विभागांच्या परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात. काही विभागांच्या मान्यता मिळण्याची प्रक्रिया सात दिवसात पूर्ण न झाल्यास त्या प्राप्त झाल्या आहेत असे समजण्यात यावे. यासाठीची यंत्रणा उभारण्यात यावी. असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
           आज मंत्रालयात आयोजित केलेल्या विविध विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कामगार मंत्री प्रकाश महेता, कामगार राज्यमंत्री विजय देशमुख, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर,कामगार विभागाचे प्रधान सचिव बलदेव सिंह, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव,महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद, पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर सिंह, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जास्तीत जास्त उद्योगांना राज्यात आकर्षित करण्यासाठी विविध स्तरावर पोषक वातावरण कसे तयार करता येईल, याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कारखाने व संस्था यांचे परवाने देण्यासाठीची ऑनलाईन कार्यप्रणाली विभागाने 2 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी,तसेच पर्यटन क्षेत्रातील हॉटेल व्यवसाय, आदरातिथ्य सेवा, पुरविणाऱ्या व्यावसायिकांनी पर्यटकांच्या सोई-सुविधांसह त्यांच्या सुरक्षेसंबंधीची ही जबाबदारी सांभाळणे आवश्यक आहे.
०००

ग्वांगडांग प्रांताचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री भेट राज्यात चीनी उद्योग उभारण्यास सहकार्य - मुख्यमंत्री

महाराष्ट्र आणि ग्वांगडाग प्रांतामध्ये होणार औद्योगिक करार
मुंबई, दि. 18 : देशात आणि विशेषत: राज्यात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण आहे. राज्यात माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक क्षेत्र विकास, विविध उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ग्वांगडांग प्रांतातील विविध कंपन्या उत्सुक असून त्यांना शासन संपूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.
सहयाद्री अतिथीगृह येथे चीन येथिल ग्वांगडांग प्रांताचे राज्यपाल झ्यू शिउडान यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येथे भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त सुधीर श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन सुनिल पोरवाल, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मल्लिक, प्रधान सचिव व्यय सीताराम कुंटे, एमआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी, पर्यटन सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, उद्योगपती सर्वश्री दिलीप पिरामल, सचिन जिंदल, निखिल गांधी, निरंजन हिरानंदानी, बिपीन चंद्रानी, आदि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यास ग्वांगडांग प्रांतातील विविध कंपन्या उत्सुक आहेत. राज्याचे आणि ग्वांगडांग प्रांताचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी कंपन्या समवेत करार करणे आवश्यक आहे व त्याची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
 राज्यपाल झ्यू शिउडान म्हणाले की, भारत देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोलाचे योगदान आहे. महाराष्ट्र हे आर्थिक विकासाचा मॉडेल आहे व राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी ग्वांगडांग प्रांतातील जवळजवळ तीस कंपन्या गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी राज्य सरकारने सहकार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या बैठकीदरम्यान ग्वांगडांगच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना ग्वांगडांग येथे येण्याचे निमंत्रण दिले.

**************

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२५ अंतर्गत 1500 कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई दि. 18 :महाराष्ट्र शासनाने १० वर्षे मुदतीचे 1500 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले असून ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल.
            शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट शाखेच्या वतीने दि. २० जुलै २००७ च्या सुधारित सर्वसाधारण अधिसुचनेतील कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.  अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसुचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसुचित रकमेच्या जास्तीत जास्त एक टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंतच वाटप करण्यात येईल.       
            भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 22 सप्टेंबर  २०१५ रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात हा लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 22 सप्टेंबर  २०१५ रोजी संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन, (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सादर करावयाची आहेत.
            यामध्ये स्पर्धात्मक बिडस संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन
(ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत सादर करावेत.
            अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकिंग सोल्यूशन (ई-कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी १०.३० ते ११.३० पर्यंत सादर करावेत.
            लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याचदिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 23 सप्टेंबर, २०१५ रोजी करण्यात येईल.
            यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 23 सप्टेंबर, २०१५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने , बँकर्स धनादेश/प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येतील. कर्जरोख्यांचा कालावधी दहा वर्षांचा असेल. रोख्यांचा कालावधी  दि. 23 सप्टेंबर, २०१५ पासून सुरु होईल. कर्जरोख्याची परतफेड दिनांक 23 सप्टेंबर, २०२५ रोजी पूर्ण किंमतीने केली जाईल.
            अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दर साल दर शेकडा कूपन दराएवढा असेल.  व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक 23 मार्च  आणि 23 सप्टेंबर  रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
            शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकिंग विनियम अधिनियम १९४९ खालील कलम २४ अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. हे रोखे पुन: विक्री-खरेदीसाठी अनुज्ञेय असतील अशी माहिती वित्त विभागाच्या 18 सप्टेंबर  २०१५ रोजीच्या अधिसुचनेत नमूद करण्यात आली आहे.

00000

राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबतशासन सकारात्मक

मुंबई, दि. 18 : राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक विचार करीत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
            मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव एस. के. श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव प्रमोद नलावडे, राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण, महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कदम तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
            या बैठकीत अनुकंपा तत्त्वावरील सेवा भरती, सेवानिवृत्त तसेच वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास सेवेत सामावून घेणे आदीमागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००