गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण राज्यात राबविणार मुख्यमंत्री




          मुंबई, दि. 28 : राज्यातील सामान्य जनतेला निरोगी जीवन देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.  दुसऱ्या टप्प्यात राज्यात सर्वत्र ही योजना राबविण्यात येणार असून सुमारे दोन कोटी पेक्षा जास्त कुटुबांना त्याचा लाभ होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
          राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्यासाठीच्या आरोग्य पत्र वाटपाचा कार्यक्रम येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झाला त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी  मुंबई शहर व उपनगरातील सुमारे  18 लाभार्थी कुटुंबियांना आरोग्यपत्राचे वाटप करण्यात आले.
          यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री सुरेश शेट्टी,  अल्पसंख्याक मंत्री नसीम खान, संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, आरोग्य राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान, महापौर श्रद्धा जाधव आदींसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
          मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात 8 जिल्हयात ही योजना सुरू करण्यात आली असली तरी संपूर्ण राज्यात ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याचा प्रयत्न राहणार आहे. या योजनेसाठी लागणारा संपुर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात येईल एखादा गंभीर आजार झाला तर संपुर्ण कुटूंबावर त्याचा परिणाम होतो. आजाराचा खर्च भागविणे अशक्य झाल्यामुळे संपुर्ण कुटूंब उद्‌ध्‍वस्त होवू शकतो. अशा कुटूंबांना आधार देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यात प्रथमच सुरु करण्यात आली आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही संपूर्णपणे नाविण्यपूर्ण असून यामध्ये 972 आजारांचा व 121 सेवांचा समावेश राहणार आहे. आरोग्य योजनेच्या तक्रार निवारणसाठी स्वतंत्र सुविधा राहणार असून या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील केशरी व पिवळे कार्डधारक असलेल्या सर्वच कुटूंबांना मिळणार असल्याचेही मुख्यमत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेबरोबरच आपत्कालीन वैद्यकीय सेवा ही दुसरी महत्वाकांक्षी योजना राज्य शासन केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत विशिष्ट क्रमांकावर दूरध्वनी केल्यास वेळेत दहा मिनिटाच्या आत रुग्णवाहीका रुग्णासाठी उपलब्ध होणार आहे.त्यासाठी सुमारे 1000 रुग्णवाहिका राज्यभरात सुरू करण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

उपस्थितांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे ग्रामीण भागातील अत्यंत गरीब रुग्णांना नवीन जीवन मिळणार असून आरोग्य पत्र गरीब, निराधार, विधवा भगिनींसाठी कुटूंबाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमधील एकही लाभार्थी आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतांनाच निर्धारीत केलेल्या रुग्णालयामध्ये दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होतील याची विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत चिंता व्यक्त करून उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.
          आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी यांनी 1 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्‍या कुटूंबांना आरोग्य सुविधा पुरविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजनेमुळे हृदय रोग, कॅन्सर आदी आजारासाठी आता तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. साधारणता 1 मार्च 2012 पासून या कार्डधारकांना या योजनाचा लाभ मिळणार असल्याचेही श्री. शेट्टी यांनी यावेळी सांगितले.
          राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांनी आर्थिक परिस्थिती अभावी उपचार करु न  शकणा-यांसाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून या योजने अंतर्गत 121 सुविधा उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील कुटूंबांना आरोग्य सुविधेचा लाभ मिळवून देण्यासाठी आरोग्य मित्र कर्मचारी राहणार असून जनतेनेही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
          सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव भूषण गगराणी प्रास्ताविकात राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची माहिती दिली..
          कार्यक्रमास आमदार ॲनी शेखर, नवाब मलीक, अमीन पटेल, विनोद घोसाळकर, मधु चव्हाण, अशोक जाधव, मिलींद कांबळे, नॅशनल इन्श्युरन्सचे एन. एस. आर चंद्रप्रसाद, एनआरएचएमचे प्रकल्प संचालक विकास खारगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. व्यंकटेशन यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा