गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

साहित्यिकांनी लिहिलं ते वाचलं गेलं पाहिजे - वसंत आबाजी डहाके



साहित्यिकांनी लिहिलं ते वाचलं गेलं पाहिजे - वसंत आबाजी डहाके
राज्यातील प्रसिध्द साहित्यिक तथा समीक्षक वसंत आबाजी डहाके यांना चित्रलिपी` या त्यांच्या कवितासंग्रहासाठी गेल्या वर्षी प्रतिष्ठेचा `साहित्य अकादमी` पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार स्विकारल्यानंतर त्यांनी `महान्यूज`शीही संवाद साधला होता. ती मुलाखत अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानिमित्त पुन्हा प्रसिध्द करण्यात येत आहे.

प्रश्न : आपल्या `चित्रलिपी` या काव्य संग्रहाला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले. या संग्रहाबद्दल आपण काय सांगाल ?
उत्तर : यापूर्वी माझे `योगभ्रष्ट`, `शुभ वर्तमान` हे कविता संग्रह प्रसिध्द झाले आहेत. हे दोनही संग्रह त्या-त्या परिस्थितीचे चित्र मांडणारे आहेत. परंतु आता काळ बदलला आहे. सगळीकडे ग्लोबलायझेशनचे वारे वाहत आहेत. हे ग्लोबलायझेशन नेमके कोणत्या स्वरूपाचे आहे, त्याचा व्याप काय असणार आहे, हे मात्र कळायला मार्ग नाही. जागतिकीकरणाच्या या जगात माणसाचे स्वरूप, अस्तित्व, स्वत्व, सत्य काय राहणार आहे, याचाही अंदाज घेता येत नाही. ग्लोबलायझेशनचा विचार करताना अनेक प्रश्न निर्माण झालेत. त्या प्रश्नातूनच `चित्रलिपी` साकारली गेली. ग्लोबलायझेशनच्या जगात सामान्य माणसाची होणारी घालमेल यातून मांडण्यात आली आहे.

प्रश्न : मराठी साहित्य हे काळाशी सुसंगत नाही, अशी टीका केली जाते ?
उत्तर : साहित्य ही एक मोठी ताकद आहे. कोणत्याच साहित्यातून आपणास समाजावर एकदम प्रभाव झालेला पाहावयास मिळत नाही. बदल झपाट्याने होत असतात परंतु साहित्यातून होणारे बदल हे हळूहळू होत जातात. साहित्यात काही त्रुटी, विसंगती असू शकतात. अशा वेळी वाचकांनीही त्या लेखकांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून मराठी साहित्याचे वाचन केल्यास या साहित्याने तथा लेखकांनी समाजाला फार मोठे योगदान दिल्याचे आपल्या लक्षात येईल. साहित्य हे त्या-त्या काळाचे प्रतिरूप असते. आजचे साहित्य आजच्या परिस्थितीतून निर्माण झाले आहे.

प्रश्न : मराठी साहित्यातील रसाळता कमी होत असल्याची टीकाही केली जाते ?
उत्तर : गेल्या तीस-चाळीस वर्षापूर्वी समाजाचे प्रश्न वेगळे होते. तेव्हा मनोरंजनावर भर होता. परंतु ते साहित्य आजच्या घडीला लागू पडणारे नाही. त्यामुळे ते उत्कृष्ट साहित्य होते असेही म्हणता येत नाही. आता सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती जटील झाली आहे. आता लेखकांसमोर जीवनाच्या या कठीण बाबींचा प्रश्न आहे. लेखकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. ते आपल्या साहित्यातून व्यक्त करतात. कधीकधी हे लेखन अस्वस्थ करणारेही असते. परंतु काळच तसा असल्याने ती लेखकांची गरज आहे. त्यामुळे आजचे लेखन रसाळ नाही असे म्हणता येणार नाही. पूर्वीचे साहित्य तथा आताचे साहित्य आपआपल्या काळानुसार सुसंगत असे आहे.

प्रश्न : मराठी साहित्य राष्ट्रीय स्तरावर फारसे पोहोचले नाहीत, त्यासाठी कोणत्या विशेष प्रयत्नांची गरज आहे ?
उत्तर : मराठी साहित्य राष्ट्रीय पातळीवर येण्यासाठी ते हिंदीत अनुवादीत होणे गरजेचे आहे. परंतु अनुवादाची ही प्रक्रिया थांबली आहे. भालचंद्र नेमाडे हे मराठीतील सर्वमान्य साहित्यिक आहेत. परंतु त्यांची `कोसला` वगळता अन्य कादंबरी हिंदीत अनुवादीत झालेली नाही. मधल्या काळात दिलीप चित्रे, नारायण सुर्वे यांच्या कविता हिंदीत अनुवादीत झाल्या. हिंदी साहित्य मराठीत आणणारे भरपूर आहेत. परंतु मराठी साहित्य हिंदीत आणणारे नाहीत. त्यासाठी होणारे परिश्रमही कमी पडत आहे. अनुवादाची ही प्रक्रिया वेगाने वाढण्याची गरज आहे.

प्रश्न : इंग्रजी माध्यमाच्या भडिमारात विद्यार्थी `मराठी`` पासून दूर जात आहे, असे वाटते का?
उत्तर : विद्यार्थी मराठी पासून दूर जात आहे, याबाबत दुमत नाही. मराठी हा विषय शासनाने केवळ दहावीपर्यंत सक्तीचा केला आहे, आणि या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना मराठीचे फारसे ज्ञान मिळत नाही. त्यापुढील शिक्षणात मराठी साहित्य हा विषय घेणार्‍या विद्यार्थ्यांपर्यंतच मराठी सिमीत झाली. मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती टिकविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरच्या शिक्षणात मराठी हा विषय सक्तीचा असावा, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी साहित्यिकांनी शासनस्तरावर प्रयत्नही चालविले आहे. त्याला निश्चित यश येईल. मराठीसाठीचे हे प्रयत्न शैक्षणिक स्तरावरही होणे गरजेचे आहे.

प्रश्न : सामाजिक चळवळी व साहित्य यातील संबंधांबाबत काय सांगाल ?
उत्तर : १९६५ पासून राज्यात सामाजिक, साहित्यिक अशा विविध चळवळी झाल्या. या चळवळींचे एकमेकांशी नाते होते, नव्हे साहित्य हे या चळवळींना जोडणारा सामान्य दुवा होता. हा दुवा अलिकडे क्षीण झाला असावा. समाजाची परिस्थिती बदलण्यासाठी होणारी चळवळही संपली आहे.

प्रश्न : साहित्य वाचले जात नाही अशी साहित्यिकांची खंत असते, आपणास काय वाटते?
उत्तर : साहित्य निर्माण होते त्या प्रमाणात वाचले जात नाही ही तर खंत आहेच. साहित्यातून विचार पेरले जातात. त्यामुळे साहित्यिकांनी जे लिहीलं ते वाचले गेलं तरी पुष्कळ आहे. परंतु आजच्या वाचकांचा ओढा वर्तमानपत्राकडे अधिक आहे. `टाईमपास` म्हणून वर्तमानपत्र मोठ्या प्रमाणावर वाचले जाते. चांगल्या गंभीर साहित्याचे वाचन तरूण वर्ग करत नाही. पुस्तकेही भरपूर खपतात परंतु त्यात धर्म, आरोग्य, ज्योतिष्य या पुस्तकांचाच भरणा अधिक असतो. साहित्य समाजाला, विचारांना दिशा देणारे सशक्त माध्यम आहे, त्यामुळे ते अधिक प्रमाणात वाचले गेले पाहिजे.

प्रश्न : राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्मचरित्रे लिहिली जात आहे. या साहित्यप्रकाराबद्दल काय सांगाल ?
उत्तर : आत्मचरित्र हे साहित्याचे प्रभावी माध्यम आहे. पूर्वी फार कमी प्रमाणावर आत्मचरित्रे लिहिली जायची परंतु आता त्याचे प्रमाण वाढले आहे. आत्मचरित्र हे परिस्थितीचे चित्रण मांडत असते. राज्यात भटक्या विमुक्त तथा गावगाड्याच्या लोकांनी लिहिलेली आत्मचरित्रे अत्यंत वाचनीय आहे. साहित्याचा हा प्रकार राज्यात चांगलाच लोकप्रिय झाला आहे. परंतु ही आत्मचरित्रे राष्ट्रीय पातळीवर पोहोचू शकली नाहीत. हिंदी साहित्यात आत्मचरित्रे लिहिण्याचा प्रकार फारसा रूळला नाही. महिलांची आत्मचरित्रे फार कमी पाहावयास मिळतात. परंतु राज्यात महिलाही धीटपणे पुढे येऊन आत्मचरित्रे लिहित आहेत. ही मराठी साहित्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे असे म्हणावे लागेल.

प्रश्न : आतापर्यंत आपली किती व कोणती पुस्तके प्रकाशित झाली व सद्या कुठल्या विषयावर लेखनकार्य सुरू आहे ?
उत्तर : जवळपास १९६० च्या दरम्यान मी लेखनकार्यास सुरूवात केली. १९७२ मध्ये `योगभ्रष्ट` हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. १९७५ मध्ये `अधोलोक` ही कादंबरी आली. त्यानंतर `शुभ वर्तमान` कवितासंग्रह, `प्रतिबध्द आमि मर्त्य` ही कादंबरी, `मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृति` हे पुस्तक व `संक्षिप्त मराठी वाङमय कोश`(दोन खंड), संधान-संकल्पना कोश, `डॉ.बाबासाहेब आंबेडकर : अ फोटो बॉयोग्राफी`ही पुस्तके प्रकाशित आहे. राज्यातील गोदावरी ही नदी पुढे आंध्र प्रदेशात वाहत गेली आहे. या नदीचा एक सांस्कृतिक इतिहास आहे. गोदावरीचा प्रवाह, त्याअंगाने महाराष्ट्र व आंध्र प्रदेशाचा सांस्कृतिक संबंध या विषयावर ग्रंथलेखन सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा