अहमदनगर दि.27- क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी राज्यात लवकरच नवीन क्रीडा धोरण 2011-12 राबविणार येणार असून या धोरणात लहान गावातही क्रीडा संकूल उभारण्याचा समावेश आहे. यामुळे राज्यात 300 ते 400 क्रीडा संकुल उभारतील असा विश्वास क्रीडा व युवक कल्याणमंत्री श्री पद्माकर वळवी यांनी व्यक्त केला.
नेवासा फाटा येथे क्रीडा व युवक सेवा संचालनालय व त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा मंत्री श्री पद्माकर वळवी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेसाठी 19 राज्यातील 482 खेळाडूनी व 85 मार्गदर्शकांनी भाग घेतला.
अध्यक्षस्थानी माजी आमदार पांडूरंग अभंग होते. प्रमुख पाहुणे म्हणून साहेबराव घाडगे पाटील, राज्य धनूर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदूरकर हे उपस्थित होते.
ना.वळवी म्हणाले की, राज्यात धनूविर्द्येची चांगली प्रगती होत आहे. शालेय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. नवीन क्रीडा धोरणात खेळाडूंना अधिक सुविधा देण्यात येणार आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी आस्थापनांमध्ये 5 टक्के जागा खेळाडूसाठी राखीव जागा तसेच खेळाडूंची प्रगती पाहून थेट भरतीही करण्याचा निर्णय शासन घेणार आहे. नव्या क्रीडा धोरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा विद्यापिठाचाही समावेश असणार आहे. साहसी खेळांना राजमान्यता देण्यात येणार आहे. सद्या 44 प्रकारचे खेळ असून 20 नवीन खेळाचा समावेश करण्यात येणार आहे. जागा उपलब्ध करुन दिल्यास क्रीडा संकूल उभारण्यात येईल असे ते म्हणाले.
माजी आमदार श्री पांडूरंग अभंग म्हणाले की, ग्रामीण खेळाडूंत देश व अंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळविता येणासारखे गुण आहेत. त्यांना संधी देण्याचे कार्य नेवासा येथे होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
प्रारंभी आनंद व्यंकेश्वर यांनी प्रस्ताविकात राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा आयोजनामागील भुमिका विषद केली.
आभार जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांनी मानले. या सभारंभास मोठया संख्येने क्रीडा प्रेमी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा