मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

आदिवासीकरिता विशेष योजना राबविण्यासाठी 7 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीला वित्तीय मान्यता


मुंबई, दि. 2 : आदिवासी उपयोजने अंतर्गत विदर्भ विकास कार्यक्रमासाठी व विदर्भ विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील 30 हजार आदिवासी कुटूंबांचे उत्पन्न वाढविण्याकरिता विशेष योजना राबविण्यासाठी आदिवासी विभागाने सन 2011-2012 साठी केलेल्या 15 कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी  7 कोटी 50 लाख रुपयांच्या रकमेस वित्तीय मान्यता दिली आहे.
          या विशेष योजनेंतर्गत उपलब्ध तरतुदीतून लाभार्थ्यांचे जास्तीत जास्त लक्ष्य पूर्ण होण्याकरिता केवळ विहिरींवर खर्च न करता, ही योजना राबविताना  जुनी विहीर दुरुस्त करणे, इनवेल बोअरिंग, पाईप लाईन, पंपसंच, नवीन विहिरी, धान्यकोठी, ताडपत्री अशा इतरही घटकांवर नमूद केलेल्या अनुदान मर्यादेनुसार खर्च करणे आवश्यक आहे.
          आदिवासी क्षेत्रातील लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळेल. आदिवासी क्षेत्राबाहेरील लोकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल. ज्या लाभार्थ्यांना अद्याप शेतीविषयक लाभ मिळालेले नसतील, असे लाभार्थी प्राथम्याने निवडण्यात येणार आहेत. अशासकीय लाभार्थ्यांना योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल. परंतु असे लाभार्थी उपलब्ध न झाल्यास इतर लाभार्थ्यांचा विचार केला जाईल. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड करताना या बाबीं विचारात घेतल्या जातील.
000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा