घरपोच धान्य योजनेच्या यशस्वी अनुभवाच्या आधारे राज्यातील सर्व जिल्ह्यात तसेच मुंबई/ठाणे शिधावाटप क्षेत्रात धान्य वितरणाची सुधारित प्रणाली-धान्य हमी योजना राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शिधापत्रिका धारकांना योग्य दर्जाचे व निर्धारित भावात अन्नधान्य खात्रीशीररित्या उपलब्ध होईल याची हमी देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत एकाचवेळी तीन महिन्यांचे धान्य (गहू व तांदूळ) दारिद्रयरेषेखालील (BPL) व अंत्योदय अन्न योजना (AAY) या योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत करण्यात येणार आहे.
धान्य वितरणाची ही सुधारित प्रणाली ऐच्छिक असून त्यासाठी बी.पी.एल व अंत्योदय अन्न योजनेच्या किमान 60 टक्के शिधापत्रिकाधारकांनी तहसीलदार/ शिधावाटप अधिकारी यांच्याकडे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी देण्याकरिता लेखी मागणी करणे आवश्यक आहे. इच्छूक शिधापत्रिकाधारकांनी त्यांना पुढील 3 महिन्यात आवश्यक असलेल्या धान्याची एकत्रित रक्कम महिन्याच्या 20 तारखेपर्यंत रास्तभाव दुकानदाराकडे जमा करणे आवश्यक राहील, जेणेकरुन पुढील महिन्याच्या 6 तारखेपर्यंत धान्य वाहतूक करुन ते पुढील अन्नदिनाच्या दिवशी गावात वाटपासाठी उपलब्ध करुन देणे शक्य होईल.
एपीएल व अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थ्यांना तसेच वरील योजनेत सहभागी न होणाऱ्या बी.पी.एल. व अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना धान्य, साखर, केरोसिन व पामतेल या शिधावस्तूंचे वितरण रास्त भाव / शिधावाटप दुकानातून पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे.
वरीलप्रमाणे संपूर्ण राज्यात धान्य वितरणाच्या सुधारित प्रणाली अंतर्गत प्रत्येक महिन्यातील दिनांक 7 हा दिवस "अन्न दिवस" (Food Day) राहील. या दिवशी जाहीर पध्दतीने रास्त भाव दुकान/चावडी/इतर सार्वजनिक ठिकाणी शिधापत्रिकाधारकांना धान्याचे वितरण करण्यात येईल. धान्याचे वितरण शासन प्रतिनिधी/ दक्षता समिती सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात येईल व धान्य वाटपाचा अहवाल तहसिलदार/ शिधावाटप अधिकारी यांचेकडे पाठविण्यात येईल.
-- --00----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा