6 जानेवारी 1832 साली मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ सुरु झाले. या घटनेला आज जवळपास 180 वर्षे झाली. बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर दर्पणचे संपादक होते. त्यांनी मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र काढून मराठीतील `आद्य संपादक` होण्याचा बहुमान मिळविला. अर्थातच मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणूनच बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख करावा लागतो. त्यांच्या या महान कार्याचा अभिमान वाटतो, म्हणूनच 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आद्य संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या महनीय कार्याची ही थोडक्यात ओळख.
|
भारतातील पहिले वृत्तपत्र जेम्स् हिकी यांनी 29
जानेवारी 1780 रोजी बेंगॉल गॅझेट अथवा
कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायजर या नावाने सुरु केले होते. हिकीच्या पत्रावर A weekly
political and
commercial paper open to all parties but influenced by none.अशा ओळी असत म्हणजेच साप्ताहिक सर्वांसाठी खुले
पण निर्भय असावे, अशी भूमिका होती. हिकीच्या नंतर जवळपास 50 वर्षांनी बाळशास्त्री
जांभेकर यांनी सुरु केलेल्या दर्पण मध्ये त्यांनी हेच तत्त्व पाळले
क्रांतीकारी घटना
वयाच्या
अवघ्या विसाव्या वर्षी एक ऐतिहासिक क्रांतीकारक पाऊल उचलून बाळशास्त्रींनी संपूर्ण
मराठी वृत्तपत्रसृष्टीवर आपल्या कार्याचा ठसा उमटविला. ती ऐतिहासिक घटना म्हणजे
बाळशास्त्रींचे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण. या घटनेमुळे मराठी
वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर ओळखले जाऊ लागले. केवळ दर्पण हे
पहिले वृत्तपत्रच नव्हे, तर त्यांनी दिग्दर्शन हे पहिले मासिकही सुरु केले.
बाळशास्त्रींचा जन्म सिंधुदुर्ग जिल्हयाच्या देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या
खेडेगावात 1812 साली झाला.
वृत्तपत्राचे सामर्थ्य
हिकीच्या वृत्तपत्रातून जे स्वातंत्र्य अपेक्षित
होते, ते स्वातंत्र्य फक्त इंग्लंडमधील वृत्तपत्रांना होते. आपल्या वृत्तपत्रातून
त्यांनी इंग्रज कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. भारतातील जनतेबद्दल
अथवा त्यांच्या त्रासाबद्दल त्याला काही देणे-घेणे नव्हते. मात्र बाळशास्त्रींची
दृष्टी अत्यंत व्यापक असल्याने त्यांनी मुद्रणकलेचे क्रांतीकारत्व हेरले. या कलेचा
संपूर्ण परिचय करुन घेतला. वृत्तपत्रांचे सामर्थ्य त्यांनी ओळखले आणि दर्पणद्वारे
समाजाला आरसा दिला. पहा! आपले प्रतिबिंब आणि मगच ठरवा, असा संदेश दिला. वृत्तपत्र हे ज्ञान-विज्ञान यांच्या
प्रसाराचे मुख्य साधन आहेच. परंतु समाजाची सार्वजनिक नितिमत्ता सुधारणे, जनतेत
जागृती निर्माण करण्याचे काम वृत्तपत्राचे आहे, हे बाळशास्त्रींनी दर्पणद्वारे
लोकांच्या मनावर बिंबवलं.
पहिला महापुरूष
इंग्रजांच्या काळातील लोकांसमोर हे राज्य म्हणजे आपल्याला घातक, मारक, की तारक? अशी संभ्रमावस्था झाली होती. मात्र काही विचारवंतांच्या मनात एक वेगळेच वादळ निर्माण होऊन विचारांचा जोरदार प्रवाह तयार झाला होता. जे आहे, जे नाही त्यातच आहे, म्हणून लोक त्याकडे आकर्षिले जात आहेत, याची जाणीव त्यांना झाली .समाजाला जागृत करायलाच पाहिजे, स्वत्वाची जाणीव निर्माण झालीच पाहिजे, असा विचार ज्या मंडळीच्या मनात आला, अशा पैकीच एक बाळशास्त्री होते. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी आपले राज्य जाऊन इंग्रजांचे राज्य का आले, याचे अचूक निदान करणारा महाराष्ट्रातील पहिला महापुरुष म्हणजे बाळशास्त्री जांभेकर, असे म्हटले आहे.
इंग्रजी भाषेचा सखोल अभ्यास करुन विविध विषयांचे ज्ञान मिळवून त्याचा उपयोग आपल्या समाजाला कसा होईल, याकडे त्यांचा ओढा होता. अगदी वयाच्या अकराव्या वर्षी संस्कृतचे शिक्षण पूर्ण करुन जांभेकरांनी मुंबई गाठली. इंग्रजीचे ज्ञान आत्मसात केले. मराठी, संस्कृत, इंग्रजी, बंगाली, कानडी, पारसी, गुजराती अशा नऊ भाषांवर त्यांची चांगलीच पकड होती. पुढे 1834 साली त्यांची नियुक्ती मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झाली. ते पहिले नेटिव असिस्टन्ट प्रोफेसर ठरले. पितामह दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी होते.
दर्पण : एक ठिणगी
आपल्या दर्पणमधून बाळशास्त्री जांभेकरांनी समाजजागृतीचे जे कार्य केले, त्यातून समाजात राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण झाली. आपल्या या वृत्तपत्र माध्यमाद्वारे त्यांनी एक ठिणगी पेटवली. आणि याच ठिणगीचा पुढे ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ अशा अग्रलेखाद्वारे लोकमान्यांनी भडका केला. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य ओळखू लागले, ते या ठिणगीद्वारे, असे म्हटले तरी ते उचित ठरेल.
दर्पणनंतर अनेक वृत्तपत्रे आली आणि प्रत्येक वृत्तपत्रातून दर्पणचेच प्रतिबिंब थोड्याफार प्रमाणातून जनतेच्या समोर आले. दर्पणचा काळ फारच कमी वर्षांचा ठरला. अगदी आठ वर्षाच्या काळात दर्पणने आपली कीर्ती सर्वत्र पसरविली आणि सर्वार्थाने मराठी वृत्तसृष्टीतील आद्य वृत्तपत्र म्हणून प्रसिद्ध झाले. आजही दर्पणचीच ठिणगी सर्वत्र पेटत आहे. हिकीचे बेंगॉल गॅझेट हे भारतातील पहिले वर्तमानपत्र असे मानले तर बरोबर त्यानंतर 50 वर्षांनी बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण सुरु केले. जेम्स हिकीला 1780 मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीमधून काढून टाकले, तेव्हा त्याने आपले बेंगॉल गॅझेटियर सुरु केले होते. थोडक्यात त्याला काढल्यामुळे झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्याने वृत्तपत्र काढले. मात्र बाळशास्त्री जांभेकरांची भूमिका त्यापेक्षा कितीतरी वेगळी होती, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. इंग्रजांच्या हातात आपले राष्ट्र असताना राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करुन जनतेला इंग्रज राजवटीच्या विरोधात उभे करण्याच्या दृष्टीने दर्पण काढले गेले.
ग्रंथ निर्मिती
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832.
दिग्दर्शन या आद्य मराठी मासिकाचे संपादक 1837 1) बालव्याकरण 2) नितीकथा 3) सारसंग्रह 4) भूगोल विद्या 5) इंग्लड देशाची बखर भाग 1, भाग 2, 6) आल्फेड राजा 7) इंग्लड देश, अमेरिकन संस्थाने यामधील तंटा 8) मरे यांच्या इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप 9) शब्दसिध्दीनिबंध 10) हिंदुस्थानचा इतिहास 11) हिदुस्थानातील इंग्लिशांच्या राज्याचा इतिहास 12)
गणित शास्त्राचा उपयोगाविषयीचे संवाद 13) पुनर्विवाह प्रकरण 14) ज्ञानेश्वरी 15) शून्यलब्धिगणित 16) मानसशक्ती विषयीचे शोध असे विविध ग्रंथ बाळशास्त्रींनी लिहिले.
विविध पुरस्कार
दर्पणकारांना `जस्टिस ऑफ पीस` ही सन्मानाची उपाधी इंग्रजांनी देऊन त्यांचा गौरव केला होता. अक्कलकोट संस्थानचे युवराजगुरु, कुलाबा वेधशाळेचे ज्योतिर्निरीक्षक, आद्य भारतीय इतिहास संशोधक, मराठी भाषेचे चिकित्सक शब्दकोशकर्ते अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
बाळशास्त्री केवळ पत्रकार, उत्तम शिक्षक वा ग्रंथकार नव्हते, तर त्यांनी सरकारी नोकरीची बंधने साक्षेपाने सांभाळून देशोन्नतीच्या निरनिराळया चळवळींना चालना दिली. 17 मे, 1846 रोजी मुंबई येथे त्यांचे देहावसान झाले. 35 वर्षाच्या अल्प जीवनात त्यांनी महान कार्य केलं. मनुष्य किती जगला, यापेक्षा तो कसा जगला, याला अधिक महत्त्व आहे. अन्यथा वटवृक्षापेक्षा चंदनाचे महत्त्व कधीच वाढले नसते, हे बाळशास्त्रींच्या जीवन कार्यातून दृष्टोत्पत्तीस आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा