मंगळवार, ३ जानेवारी, २०१२

रायगड, नंदुरबार, सातारा व मुंबई महानगर परिसर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय


रायगड जिल्ह्यातील अलिबाग, नंदुरबार, सातारा मुंबई महानगर परिसर येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर सुरू करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
            प्रस्तावित 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांसाठी एकूण 1597 कोटी 45 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून सन 2011-12 ते 2015-16 या 5 वर्षात टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे आवश्यकता भासल्यास वेळोवेळी पूरक मागणीद्वारे निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली.
            गेल्या 7-8 वर्षात राज्यामध्ये एकही नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले नसल्याने तसेच राज्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ  झाल्याने वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता होती.
            वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या कमी असल्याने या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही. नवीन वैद्यकीय महाविद्यालयांमुळे या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. तसेच वरील 4 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाल्यानंतर त्या भागात रुग्णालये सुरू होतील. या रुग्णालयाचा लाभ त्या भागातील नागरिकांना होईल.         
---0---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा